देवी रुक्मिणीच्या पालखीला पंढरपुरात मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 01:13 AM2019-08-11T01:13:21+5:302019-08-11T01:13:41+5:30
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यात श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान मिळाले व महानैवेद्य सुरू करण्यात आला आहे, माहेराची पालखी या नात्याने कौंडण्यपूर येथील पालखीला मागील सहा वर्षांपासून हा सन्मान प्राप्त झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यात श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान मिळाले व महानैवेद्य सुरू करण्यात आला आहे, माहेराची पालखी या नात्याने कौंडण्यपूर येथील पालखीला मागील सहा वर्षांपासून हा सन्मान प्राप्त झालेला आहे. यासंदर्भात श्रीक्षेत्र पंढरपूर संस्थानचे शासकीय व्यवस्थापकांचे पत्र गुरुवारी कौंडण्यपूर संस्थानला प्राप्त झाले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरद्वारे ही सेवा सहा वर्षांपासून सुरू केली असल्याचे पत्र तेथील व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार यांनी ८ जुलैला श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, कौंडण्यपूरच्या अध्यक्षांना पाठविले आहे. सहा वर्षांपूर्वी आषाढी सोहळ्यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीप्रमाणेच ४२४ वर्षांची परंपरा लाभलेल्या रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान व महानैवेद्याचा मान मिळावा, अशी विनंती आमदार यशोमती ठाकूर यांनी पंढरपूर संस्थानला सातत्याने केली होती. पंढरपूर येथे आषाढीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. त्यानुसारच कार्तिक एकादशीला श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे रुक्मिणीदेवीची शासकीय महापूजा व्हावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहेत. ही पार्श्वभूमी याला असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.