महामानवाला आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:28 AM2017-12-07T00:28:37+5:302017-12-07T00:29:14+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६१ व्या महापरिनिर्वाण दिनी बुधवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांनी आदरांजली वाहिली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६१ व्या महापरिनिर्वाण दिनी बुधवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांनी आदरांजली वाहिली. यावेळी शहरातील इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर अनुयायांच्या गर्दीने फुलला होता.
इर्विन चौकातील पुतळा परिसर आंबेडकरी अनुयायांनी ‘जब तक सूरज चाँद रहेगा - बाबा तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून सोडला. महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांचे लोंढे शहराच्या कानाकोपºयातून इर्विन चौकाकडे सकाळपासून येत होते. दिवस वर आला तसतशी गर्दी अफाट झाली. परिसरात बाबासाहेबांची छायाचित्रे, प्रतिमा, हार-फुलांची दुकाने लक्ष वेधून घेत होती. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदी समाजप्रबोधनकारांचे ग्रंथ तसेच पंचशील, निळे झेंडे तसेच गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमा तसेच इतर किरकोळ वस्तूंची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात झाली. त्यांनी दिलेला विचार समाजाच्या महापरिनिर्वाण दिनी तळागाळपर्यंत पोहोेचावा, यासाठी समता सैनिक दलाचे मार्गदर्शक स्टॉल होते.
शहरात ठिकठिकाणी अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुर्वेद मेडिकोज असोसिएशन आणि विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय यांच्यावतीने रोगनिदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय असोसिएशन इंजिनिअर्स, बामसेफ, समता सैनिक दल, सिकलसेल संघटनेच्यावतीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
यंदाही येथील आक्रमण संघटनेच्यावतीने ‘महामानवाला बहुजन समाजाची आदरांजली’ हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुनील गजभिये होते. मुख्य अतिथी म्हणून रिपाइं नेत्या कमल गवई, राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, ज्येष्ठ नेत्या पुष्पा बोंडे यांच्यासह दिलीप एडतकर, मुकुंद खैरे, उमेश इंगळे, रवींद्र मुंद्रे, राजाभाऊ गुडदे, नगरसेविका सोनाली गवई, प्रल्हाद ठाकरे, नीलेश मेश्राम, प्रल्हाद ठाकरे, सुधीर तायडे आदी उपस्थित होते. यावेळी महामानवाला बिगुलावर मानवंदना अर्पण करण्यात आली. संचालन जगदीश गोवर्धन व आभार प्रदर्शन शीतल पाटील यांनी केले. अमरावती महापालिका कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने अशोक खानोरकर, नितीन अग्रवाल, अरविंद गुल्हाने, अजय थुल आदींनी आदरांजली अर्पण केली.
आ. रवि राणा यांनी महापरिर्वाण दिनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. इर्विन चौक तसेच भीमटेकडी येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला आ. राणांनी हार्रापण केले. निंभोरा येथील समाजकल्याण वसतिगृह, महाजनपुरा येथील कार्यक्रमातही उपस्थिती दर्शविली. संविधान उद्देशिका वितरण उपक्रम राबवण्यात आला. राजापेठ स्थित युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयातही बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहिली.
बडनेºयातील सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश बोरकर, विठ्ठल मेश्राम, पुंजाराम ठवरे, प्रकाश भोवते आदींनी प्रतिमेला हार्रापण केले. समता चौकात एम.जे. ग्रुपच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरासाठी मनोज गजभिये, मधुकर साखरे आदींनी परिश्रम घेतले. दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियातर्फे बिगूल वाजवून आदरांजली वाहण्यात आली. ‘एक पेन, एक वही’ हा उपक्रम होतकरू विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. इंदिरानगरातील मिलिंद बुद्धविहारात बजरंग मोहोड, वसंत जामनिक, वसंता रामटेके, प्रल्हाद मोहोड आदींच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली तसेच शहरातील वस्त्यांमध्ये समाजमंदिर, बुद्धविहारात आदरांजली अर्पण करण्यात आली.
ज्ञानार्जनाचे स्टॉल
ठरले आकर्षण
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी इर्विन चौकात दरवर्षी होणारी अनुयायांची गर्दी ही जणू यात्रा भरल्याचा अनुभव देणारी ठरते. यंदा ज्ञानाजर्नात भर घालण्यासाठी विविध लेखकांची पुस्तके तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकांची लक्षणीय विक्री झाल्याचे दिसून आले. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आदींच्या जीवनकार्यावर असलेल्या पुस्तकांना वाचकांनी पसंती दर्शविली.