हुक्का पार्लर अवैध? सीपींचा मनाई हुकूम

By admin | Published: May 11, 2017 12:02 AM2017-05-11T00:02:37+5:302017-05-11T00:02:37+5:30

आवश्यक त्या सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या "अड्डा २७" या हुक्का पार्लरची बनवेगिरी उघड झाली आहे.

Hookah parlor illegal? Capsule mandate | हुक्का पार्लर अवैध? सीपींचा मनाई हुकूम

हुक्का पार्लर अवैध? सीपींचा मनाई हुकूम

Next

‘टोबॅको स्मोकिंग’चा परवाना : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला पोलिसांचे पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आवश्यक त्या सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या "अड्डा २७" या हुक्का पार्लरची बनवेगिरी उघड झाली आहे. महापालिका, अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी हुक्का पार्लरला नसल्याच्या माहितीवर अमरावती शहर पोलिसांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले.
अमरावतीच्या शालिन संस्कृतीला विद्रुप करू पाहणाऱ्या रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील ‘अड्डा-२७’ या हुक्का पार्लरला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मनाईहुकूम बजावला. तपासकार्य निर्णायक वळणावर पोहोचेपर्यंत या आदेशानुसार ‘अड्डा २७’ बंद ठेवणे अपेक्षित आहे.
पोलीस आयुक्त मंडलिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हुक्का पार्लरला नेमक्या कुठल्या परवानगी आहेत, कुठल्या अधिकाऱ्यांनी ती परवानगी बहाल केली आणि प्राप्त परवानगीच्या अर्टी व शर्ती काय, याबाबत अभ्यास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत. ‘अड्डा २७’ च्या संचालकाकडे महापालिका आणि अन्न व औषधी प्रशासन खात्याच्या परवानगी नाहीत. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचीच कुठलीशी परवानगी ‘अड्डा २७’कडे आहे, ही माहिती पोलिसांच्या तपास पथकाला प्राप्त झाल्यावर ती परवानगी नेमकी कशासाठी? यासंबंधाने सीपींनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयास पत्र पाठविले आहे. उत्तर आल्यावर नेमकी स्थिती स्पष्ट होईल.

अवैध प्रकारांचा संशय
सोमवारी रात्री सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र गायकवाड यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बॉम्बे स्ट्रीट कॅफेवरील ‘अड्डा-२७’ ची झडती घेतली. ‘अड्डा -२७’ मध्ये हुक्का पार्लर आढळले. त्या ठिकाणी तरुण मुले-मुली होते. पोलिसांना तेथे हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैध प्रकार होत असल्याचा संशय आहे. ‘अड्डा-२७’ बंद ठेवण्याचा आदेश त्यामुळेच देण्यात आला आहे.

तंबाखू धुम्रपान झोन
‘लोकमत’ने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांच्याशी संपर्क साधला असता शहरात ३० ते ४० हजार शॉप अ‍ॅक्ट परवाने त्यांच्या कार्यालयातून वितरित झाले. आपण सांगता अशा प्रकारासाठीचा परवाना दिल्याचे माझ्या स्मरणात नाही; तथापि गुरुवारी परवानाधारकांची कागदपत्रे तपासून याविषयी नेमकेपणाने बोलता येईल, असे ते म्हणाले. पोलिसांनी ‘अड्डा-२७’ च्या संचालकाकडून प्राप्त केलेल्या कागदपत्रांत केवळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचा ‘शॉप अ‍ॅक्ट’ परवाना आढळून आला आहे. त्यावर ’टोबॅको स्मोकिंग झोन’चा उल्लेख आहे.

अमरावतीच्या संस्कृतीसाठी बजरंग दलाचा पुढाकार
अमरावती शहराची संस्कृती जपण्यासाठी बजरंग दलाचे महानगर संयोजक निरजंन दुबे यांनी पुढाकार घेतला आहे. हुक्का पार्लरसारखे सामाजिकदृष्ट्या अरुचिपूर्ण असलेले प्रकार बंद करण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. हुक्का पार्लरला पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केला. तेथे डान्सबार सुरू असल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.

महापालिका आयुक्त कुणाची करणार पाठराखण ?
महापालिकेने हुक्का संस्कृतीला परवानगीकृत केले नसले तरी या घडामोडींदरम्यान हुक्का पार्लरचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मंगळवारी एक अर्ज महापालिकेत ‘इनवर्ड’ झाला आहे. हा अर्ज कुणाचा, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार हे हुक्का पार्लर चालविण्यास परवानगी देतात की, अमरावतीच्या सभ्य संस्कृतीची पाठराखण करतात, हे कळलेच.

‘अड्डा-२७’ कडे असलेल्या परवान्याला आधार काय, परवानगी नेमकी कशाची, या बाबी पडताळून पाहण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला पत्र पाठविले आहे.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.

Web Title: Hookah parlor illegal? Capsule mandate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.