कोल्हा ठरला काळ; भीषण अपघातात बाप-लेक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:37 AM2023-02-24T11:37:18+5:302023-02-24T11:38:56+5:30
राजना फाट्याजवळ भीषण अपघात, कोल्ह्याचाही मृत्यू
चांदूर रेल्वे (अमरावती): तालुक्यातील सोनोरा भिलटेक येथून वर्धेला स्थायिक झालेल्या तायडे कुटुंबातील बापलेक चांदूर रेल्वे ते देवगाव रस्त्यावरील राजना फाट्याजवळ भीषण अपघातात ठार झाले. यात वडिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर मुलगा अमरावतीत उपचारादरम्यान दगावला. ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यासाठी ते येत होते.
पोलिस सूत्रांनुसार, प्रभाकर तायडे (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा दिनेश प्रभाकर तायडे (३०) असे उपचारादरम्यान दगावलेल्या मुलाचे नाव आहे. मूळचे सोनोरा येथील रहिवासी आणि आता वर्धा येथे स्थायिक झालेले हे तायडे पितापुत्र एमएच ३२ बी ५९४१ क्रमांकाच्या वाहनाने वर्धा येथून भिलटेक येथे दर्शनासाठी येत होते. चांदूर रेल्वे शहरापासून जवळच असलेल्या देवगाव-चांदूर रेल्वे रस्त्यावरील राजना फाट्याजवळील वीटभट्टीजवळ कोल्हा आडवा आल्यामुळे दिनेशचे दुचाकीवरील संतुलन बिघडले आणि विरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच २७ एआर २९२७ क्रमांकाच्या दुचाकीला भिडले.
धडकेनंतर रस्त्यावर कोसळून प्रभाकर तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दिनेशला चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून अमरावतीला हलविण्यात आले. तेथे त्याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. चांदूर बाजार पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल होऊन ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. दरम्यान, तायडे पिता-पुत्राच्या दुचाकीा आडवा गेलेला कोल्हादेखील ठार झाला.
ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर
अपघात झाल्यानंतर जमलेल्या गर्दीपैकी काहींनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली आणि जखमी दिनेशला चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे अर्ध्या तासापर्यंत रुग्ण उपचाराविना होता. अर्ध्या तासानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. मरसकोल्हे आले. त्यांनी तातडीने जखमीवर प्रथमोपचार करून अमरावतीला रेफर केले. हा वेळ वाचविता आला असता, तर कदाचित दिनेशचे प्राण वाचू शकले असते, असे बोलले जात आहे.
दर्शनाची आस अधुरी
भिलटेक या पूर्वापर गावी नुकतीच यात्रा होती. त्याला उपस्थित राहता आले नाही म्हणून तायडे पिता-पुत्र गुरुवारी वर्ध्याहून दर्शनाला निघाले होते.