उद्यान विकास कामावर बालमजूर!
By admin | Published: April 12, 2016 12:14 AM2016-04-12T00:14:23+5:302016-04-12T00:14:23+5:30
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील कोट्यावधींचा घोळ उघड होत असताना महापालिकेतील बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियमांची प्रतारना केली आहे.
गंभीर अनियमितता : लक्षावधींची अफरातफर
प्रदीप भाकरे अमरावती
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील कोट्यावधींचा घोळ उघड होत असताना महापालिकेतील बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियमांची प्रतारना केली आहे. उद्यान विकासाच्या कामावर चक्क बालकांकडून मजुरी करून घेण्याचा प्रताप योजनेच्या कर्त्याधर्त्यांनी केला आहे.
उद्यान विकास कामासाठी दारिद्र्यरेषेखालील मजुरांना ठेंगा दाखवत दारिद्र्यरेषेवरील मजुरांसह बालमजुरांकडून काम करवून घेण्यात आल्याचे प्रखर वास्तव लेखापरिक्षणात उघड आले आहे. लेखापरीक्षकांनी यावर गंभीर आक्षेप नोंदवून २ लाख १८ हजारांची मजुरी खर्च अमान्य केले आहे.
उद्यान विकास कामे करण्याकरिता मजुरीवर ४० टक्के खर्च करावयास हवा होता. तथापि विभागाने कामे करण्याकरिता कनिष्ठ व सहायक अभियंत्यांनी दारिद्रयरेषेवरील व बाल कामगार हजेरी पटावर दर्शविले. तसेच हजेरी पटावर नुमना ११ देयकावर नेमणूक केलेल्या मजुरांचे बीपीएल क्रमांक नमूद असून प्रत्यक्ष दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्रात ती नावे नमूद नाहीत. त्यामुळे कनिष्ठ अभियंता व सहायक अभियत्यांनी महापालिकेसह शासनाचीही दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या परिपत्रकानुसार सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेची नियमावली निर्गमित करण्यात आली. त्यातील परिच्छेद ६० प्रमाणे को ही दारिद्रय रेषेखालील कुटूबांच्या वस्ती मध्ये असावी, तसेच दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सदस्यांच्या मार्फत व्यवस्था हवेत.
येथे नियम भंग करण्यात आला. नियमाची पायमल्ली करत मजूर वर्ग दारिद्रय रेषेवरील नेमला. तसेच किमान वेतन कायद्याचे बालमजूरासंदर्भात पालन करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार आहे.
कार्यकारी अभियंता-२ वर ठपका
सुधारित एस्टीमेट तयार केल्यानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात अनावश्यक पुरवठा दर्शवून अप्रत्यक्षरित्या कंत्राटदारासह आर्थिक सहाय्य केल्याचे दिसते. याबाबत कार्यकारी अयिभंता-२, उपअभियंता यांनी सुधारित इस्टीमेट परिमाणाचा विचार न करता १,५८,११४ रुपये अधिकचे दिले. बांधकामविषयक व इतर कामाच्या बाबीस तांत्रिक मंजुरी द्यावयास हवी होती. परंतु तसे न करता उद्यान देखभालीचे काम १८ महिन्यांसाठी इस्टीमेटमध्ये नमूद केले व नियमबाह्यरीत्या इस्टीमेटला मंजुरी दिली आहे.
७ ते ११ वर्षे वयोगटातील मजूर
मेहेरबाबा कॉलनी, वडाळी क्र.३५ ३५ लुंबिनीनगरातील उद्यान विकास कामावर सात, दहा व अकरा वर्षे वयोगटातील मुलांना मजूर म्हणून दाखविण्यात आले. व्यंकटेश कॉलनी, वडाळी व साईकृपा कॉलनी, बडनेरा अशा उद्यान विकासाच्या कामांवर बालमजुरांची नावे समाविष्ट करून त्यांच्या नावावर लाखो रुपये काढलीत.
महापालिका आयुक्तांनी द्यावे लक्ष
उद्यानाच्या देखभालीसाठी महानगरपालिकेमध्ये उद्यान अधीक्षकांचे स्वतंत्र पद कार्यरत असताना देखभालीचे काम बांधकाम विभागाकडे ठेवण्यात आले, हे संयुक्तिक नाही. या गंभीर बाबीकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
साहित्याचा गैरवापर
उद्यान विकासाच्या नस्तीत नमूद केल्याप्रमाणे त्या जागेवर काटेरी तारांचे कम्पाऊंड असल्याचे नमूद आहे. परंतु काटेरी तार, लोखंडी अॅँगल, गेट इत्यादी जुन्या साहित्य विल्हेवाटीवर आक्षेप घेत साहित्याचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांसह समूह संघटकांवर ठपका
नियमावलीच्या परिच्छेद क्रमांक ६३ नुसार चालू असलेल्या कामांना (प्रोगे्रसिव वर्ग) प्रकल्प अधिकारी व समूह संघटकांनी भेटी द्यायला हव्यात व प्रत्यक्ष कामावर दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील सदस्यच काम करीत आहेत. याची खात्री करून तसा अहवाल दारिद्रय निर्मूलन कक्षाला सादर करणे बंधनकारक आहे. तथापि कामांना भेटी देऊन अहवाल पाठविण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही.