रुग्णालयात खाटा १४३, रुग्ण २५०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:01 AM2019-08-29T01:01:39+5:302019-08-29T01:02:05+5:30
जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मेडिसीनच्या रुग्णांकरिता १४३ खाटांची व्यवस्था असताना, दाखल असलेल्या अडीचशे रुग्णांवर उपचार करावे लागले. त्यामुळे एका खाटावर दोन रुग्णांना, तर काहींना जमिनीवर झोपावे लागत आहे. ही स्थिती अनेक वर्षांपासूनची आहे. याला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे. अनेक वर्षांपासून रिक्त जागा भरण्यात न आल्याने एका वॉर्डात एकच सिस्टर, एका परिचारकेला ४० ते ६० रुग्णांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. येथील व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यंत गरजेचे असून, लोकप्रतिनिधींकडून यासंदर्भात पाठपुरावा गरजेचा झाला आहे. वैद्यकीय उपचार उत्तम असले तरी कर्मचाºयावर ताण वाढू लागला आहे. रजादेखील विचार करूनच घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
वॉर्ड सहाचा श्वास गुदमरला - वॉर्ड क्रमांक ६ मध्ये सोमवारी दाखल रुग्णांची संख्या ६५ पर्यंत होती. त्यामुळे जेमतेम २२ खाटांवर दोन-दोन रुग्ण असतानाही काही रुग्णांना जमिनीवर उपचार द्यावे लागले. १९ ते २५ आॅगस्ट दरम्यान ९ हजार ८६७ बाह्यरुग्ण तपासणी झाली आहे.
२१७ रुग्णांवर उपचार
४ मेडिसीन वॉर्ड १ मध्ये २२ खाटा असून, ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. वॉर्ड २ मध्ये ३० खाटांवर २१ रुग्ण, वॉर्ड ६ मध्ये २३ खाटांवर ४८ रुग्ण, वॉर्ड ८ मध्ये ३० खाटांवर २२ रुग्ण, वॉर्ड १० मध्ये २० खाटांवर ३८ रुग्ण, वॉर्ड ११ मध्ये १८ खाटांवर ४० रुग्ण बुधवारी उपचार घेत होते.