नाल्याच्या पुरातून गर्भवतीला खाटेवरुन नेले रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:43 PM2018-09-24T22:43:55+5:302018-09-24T22:44:11+5:30
मेळघाटात होणारे बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण रोखण्यासाठी आरोग्य विभागाला बरीच धडपड करावी लागत आहे. त्याचे उदाहरण पुन्हा शुक्रवारी समोर आले. भर पावसात एका गर्भवती मातेला तिच्या शेतातील झोपडीतून डॉक्टर, आशा वर्कर अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांच्या मदतीने नाल्याच्या पुराच्या पाण्यातून प्रसूतीकरिता नेण्यासाठी धडपड करावी लागली.
पंकज लायदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटात होणारे बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषण रोखण्यासाठी आरोग्य विभागाला बरीच धडपड करावी लागत आहे. त्याचे उदाहरण पुन्हा शुक्रवारी समोर आले. भर पावसात एका गर्भवती मातेला तिच्या शेतातील झोपडीतून डॉक्टर, आशा वर्कर अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांच्या मदतीने नाल्याच्या पुराच्या पाण्यातून प्रसूतीकरिता नेण्यासाठी धडपड करावी लागली.
हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेरदाबल्डा या गावातील गर्भवती माता काडमी हरिलाल सावलकर (३५) ही गावाशेजारी असलेल्या तिच्या शेतात राहत होती. तिची आरोग्य विभागाचे कर्मचारी वारंवार काळजी घेत होते. अशातच मागील आठवड्यापासून प्रसूतीची वेळ जवळ आल्याने हरिसाल येथील डॉ. सविता सरदार यांच्या नेतृत्वातील वैद्यकीय चमू व आशा वर्कर यांनी तिला रुग्णालयात आणण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु, ती जाण्यास नकार देत होती. तिला बरे नसल्याचे पाहून डॉक्टरांनी शुक्रवारी दवाखान्यात नेण्याचे ठरविले. शेतातून गावात येणाºया मार्गात नाल्याला मोठा पूर होता. डॉक्टरांनी गावातील युवकांची मदत घेतली. काडमीला खाटेवर झोपवून नाल्याच्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर अमरावती येथे उपचाराकारिता पाठविण्यात आले.
माझ्या अंगात भूत आहे. त्याने मला शेतातील झोपडीतच प्रसूत होण्यास सांगितल्याचे ती महिला म्हणत होती. उपचार घेण्यास तिचा स्पष्ट नकार होता. परंतु, आम्ही तिला उपचार मिळवून दिला.
- सविता सरदार
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, हरिसाल