‘शेड्युल्ड ड्रग्ज’च्या वापराबाबत रुग्णालयांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:43+5:302021-05-23T04:12:43+5:30
अमरावती : रेमडिसिविर व इतर शेड्युल्ड ड्रग्ज वापराबाबत रुग्णालयांनीही त्यांच्या स्तरावर संनियंत्रण केले पाहिजे, तसेच त्याच्या वापराबाबत संपूर्ण अभिलेख ...
अमरावती : रेमडिसिविर व इतर शेड्युल्ड ड्रग्ज वापराबाबत रुग्णालयांनीही त्यांच्या स्तरावर संनियंत्रण केले पाहिजे, तसेच त्याच्या वापराबाबत संपूर्ण अभिलेख अद्ययावत ठेवावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हा प्रशासन व अमरावती महापालिकेमार्फत कोरोना उपचार प्रोटोकॉल व म्युकरमायकोसिस आजारासंबंधी डॉक्टरांची कार्यशाळा बचतभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
नवाल म्हणाले की, रेमडिसिविर व इतर शेड्युल्ड ड्रग्ज वापराबाबत रुग्णालयांचे संनियंत्रण असावे. वापराबाबत संपूर्ण अभिलेख अद्ययावत असला पाहिजे. कुठल्या रुग्णाला इंजेक्शन दिले, त्याचे नाव, पत्ता, इंजेक्शनचा बॅच क्रमांक यांच्या नोंदी ठेवाव्यात. रिकाम्या व्हायल्सवर त्या कुठल्या रूग्णासाठी वापरल्या त्याचे नाव नोंदवून सुरक्षित ठेवाव्यात. दर आठवड्याला याबाबतचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला सादर करावा.
रुग्णालयांनी आवश्यक औषधे, इंजेक्शनबाबत प्रशासनाशी संपर्क साधा
कुठेही याप्रकारचे औषध, इंजेक्शन हवे असल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यासाठी प्रशासन व रुग्णालयांचा व्हाटसॲप ग्रुपही सुरु केला आहे. त्यामुळे मागणी नोंदवताच वेळेत पुरवठा केला जाईल. मात्र, परस्पर रुग्णांना चिठ्ठी देऊन इतरत्र शोधायला पाठवू नये. काळ्या बाजाराला उत्तेजन मिळेल अशी कुठलीही कृती करू नये. गरज असेल तेव्हा माहिती द्या. तत्काळ औषध मिळवून दिले जाईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
बाॅक्स १
तीन रूग्णालयांना नोटीस
तीन रुग्णालयांनी रेकॉर्ड न ठेवणे, तसेच विहित दरापेक्षा अधिक दर आकारल्याचे आढळल्याने नोटीस बजावण्यात आली. असे पुन्हा घडता कामा नये. रुग्णांची आर्थिक पिळवणूक होता कामा नये. प्रत्येक बाबीचा वस्तुनिष्ठ रेकॉर्ड रुग्णालयात उपलब्ध असावा. आवश्यकता असल्यास डेटा अपडेशनसाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करावी. मात्र, सर्व तपशील अचूक असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.