वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आदिवासी अपर आयुक्त कार्यालयावर आंदोलन
By उज्वल भालेकर | Published: September 12, 2023 05:57 PM2023-09-12T17:57:43+5:302023-09-12T18:01:12+5:30
शासनाच्या निर्देशानुसार वसतिगृहात सोयी-सुविधा मिळत नसल्याचा आरोप
अमरावती : शहरातील शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्देशानुसार सोयी-सुविधा मिळत नसल्याचा आरोप वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केला आहे. यासाठी मंगळवारी शहरातील सर्व आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी उपायुक्त जागृती कुमरे यांनी कार्यालयाबाहेर येत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. लेखी आश्वासन मिळेपर्यंत विद्यार्थीआंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहामध्ये शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमागे एक काॅम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे अशा सुविधा देणे अपेक्षित आहे. परंतु वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.
यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच अडविल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आत प्रवेश देण्यासाठी प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्तांनी कार्यालयाबाहेर येत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सकाळी दहा ते सायंकाळी ५ पर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. लेखी आश्वासना शिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.