अमरावतीतील परतवाडामध्ये अतिवृष्टीमुळे कोसळलं घर, एका वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 02:36 PM2017-09-21T14:36:18+5:302017-09-21T14:38:05+5:30
अमरावतीमध्ये परतीच्या पावसाने बुधवारी ( 20 सप्टेंबर )दमदार हजेरी लावत अचलपूर-परतवाडा शहरास चांगलेच झोडपून काढले. बुधवारी रात्री अचलपूर शहरात 100 मिमी तर परतवाडा शहरात 74 मिमी पाऊस झाला.
परतवाडा/अमरावती, दि. 21 - परतीच्या पावसाने बुधवारी ( 20 सप्टेंबर )दमदार हजेरी लावत अचलपूर-परतवाडा शहरास चांगलेच झोडपून काढले. बुधवारी रात्री अचलपूर शहरात 100 मिमी तर परतवाडा शहरात 74 मिमी पाऊस झाला. हा या हंगामातला सर्वांधिक मोठा पाऊस असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री पावसाला सुरुवात झाल्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला. पावसामुळे विदर्भ मिल जुनी चाळ येथील एक घर कोसळले. कोसळलेल्या या घराखाली दबले गेल्यानं लालचंद चंदन बटवे या 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी नागरिकांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यात दमदार पाऊस झाला असल्याचे वृत्त हाती आले आहे. चांदूर बाजार तालुक्यात पूर्णा धरणात ९० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे या धरणाचे दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहे. मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे येथून वाहत येणा-या अमरावती जिल्ह्यातील नद्यांना पाणी आले आहे. मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून रब्बी पिकासाठी परतीचा पाऊस संजीवनी घेऊन येणारा ठरला असल्याचे मत शेतकरी नोंदवू लागले आहेत.