घर कोसळले, मात्र मोबाईलच्या अलार्मने वाचवले कुटुंबाला; मध्यरात्रीची थरारक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 12:25 PM2022-09-15T12:25:13+5:302022-09-15T12:43:03+5:30
दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती.
चांदूर रेल्वे (अमरावती) : चुकीने लागलेला मोबाईलचा अलार्म मध्यरात्री दीड वाजता वाजला अन् कुटुंबातील एक पाहुणे उठले. त्यांना घराची भिंत पडताना दिसली. त्यांनी वेळीच सर्वांना बाहेर काढले. काही वेळातच ही खोली पूर्णत: ढासळली. तालुक्यातील कवठा कडू येथे हा थरार मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सारंगधर श्यामराव लांजेवार व त्यांची पत्नी यांचे वास्तव्य असलेले दोन खोल्यांचे टीन-मातीचे घर आहे. लग्न झालेली २५ वर्षीय मुलगी व जावई हे पाच महिन्यांच्या मुलीसह त्यांच्याकडे आले होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपले. दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती.
अशातच मध्यरात्री दीडच्या सुमारास जावयाच्या मोबाइलचा चुकीने लागलेला अलार्म वाजला. त्यांची झोप उघडली व अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंत थोडी-थोडी ढासळत आहे. त्यांनी सर्वांना हाक देऊन उठवले व घराबाहेर काढले. यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटातच ते ज्या खोलीत झोपले होते, ती खोली पूर्णतः जमीनदोस्त झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले. तलाठ्यांनी बुधवारी पंचनामा केला.