सेवानिवृत्त एएसआयच्या घरी दहा लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:41 AM2018-04-10T00:41:54+5:302018-04-10T00:41:54+5:30
शहरात काही दिवस शांतता राहिल्यानंतर चोरट्यांनी आपले डोके पुन्हा वर काढले. सोमवारी सायंकाळपर्यंत चोरीच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यामध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. राहुलनगर, मोतीनगर व एमआयडीसी येथील घरे चोरट्यांनी लक्ष्य केलीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात काही दिवस शांतता राहिल्यानंतर चोरट्यांनी आपले डोके पुन्हा वर काढले. सोमवारी सायंकाळपर्यंत चोरीच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यामध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. राहुलनगर, मोतीनगर व एमआयडीसी येथील घरे चोरट्यांनी लक्ष्य केलीत.
बिच्छुटेकडी स्थित राहुलनगर येथे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक खुशाल कांबळे यांच्या घरातून अज्ञात चोरांनी आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. कांबळे यांचे मार्डी रोडवर एक घर असून, तेथे त्यांची मुलगी राहते. रविवारी रात्री ते, पत्नी व नात असे तिघे येथे मुक्कामी गेले होते.
आवारातच घुटमळले श्वान
सोमवारी सकाळी कांबळे यांची १७ वर्षीय नात राहुलनगरातील घरी आली असता, तिला कुलूप तुटलेले व साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे निदर्शनास आले. तिने तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कांबळे यांच्या घरातील आलमारीतील २७० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ३७० ग्रॅमचे चांदीचे दागिने व १५ हजारांची रोख लंपास झाली आहे. एखाद्याने घरावर लक्ष ठेवून चोरी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. पोलीस श्वान घराच्या आवारातच घुटमळल्याने चोर नेमके कोणत्या दिशेने आले व गेलेत, याबाबत पोलिसांना कळू शकले नाही. एमआयडीसी परिसरातील रहिवासी नितीन भगवंत मोरसे हे रविवारी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. रात्री ते परतले असता, घराच्या दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी घरातील साहित्याची पाहणी केली असता, घरातील सोन्याचे दागिने व २० हजारांची रोख असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
मोतीनगरात भरदिवसा चोरी
मोतीनगर येथे मुख्य मार्गावर राहणाऱ्या सुरेखा पडोळे यांच्या घराला चोरट्यांनी सोमवारी सायंकाळी लक्ष्य केले. येथून ७२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. सायंकाळी अर्धा तासाकरिता त्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी ताफ्यासह घटनास्थळाला भेट दिली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.