तिवसा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:04+5:302021-07-23T04:10:04+5:30
डेंग्यूसदृश आजार; व्हायरल फिव्हरने नागरिक फणफणले तिवसा/सूरज दाहाट तिवसा तालुक्यातील डेंग्यूसदृश आजार व व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. उपजिल्हा ...
डेंग्यूसदृश आजार; व्हायरल फिव्हरने नागरिक फणफणले
तिवसा/सूरज दाहाट
तिवसा तालुक्यातील डेंग्यूसदृश आजार व व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल झाले आहे. तिवसा शहर व आनंदवाडीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आजाराची लागण होत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात विविध आजार वाढत आहेत. अस्वच्छता, सांडपाणी, नाल्यातील घाण, डासांची वाढ यातून सर्दी, खोकला, ताप, मलेरिया व डेंग्यू असे आजार नागरिकांना होत आहेत. पावसाळा सोबत आजार घेऊन येतो, हा तिवसा तालुक्यातील हमखास अनुभव आहे. गेल्या महिन्यापासून तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आहे आहेत. लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आजाराची लक्षणे असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा डेंग्यूच्या रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिवसा व आनंदवाडीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे हे आजार होत आहे.
कोट
डेंग्यूसदृश आजार म्हणावा लागेल, तर रुग्णांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रुग्णांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी पाणी गरम करून प्यावे.
- गौरव विधळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तिवसा
-------
आमच्या भागात नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. होतो तोही दूषित पाणीयुक्त. त्यामुळे स्वच्छ पाणी आम्हाला मिळाले पाहिजे. आमच्या भागात डेंग्यूचे रुग्ण आहेत. माझी मुलगी आजारी आहे.
- सरफराज पठाण, नातेवाईक
-------------
शहरात एका महिलेचा बळी बळी
तिवसा शहरातील माधवनगर येथील भावना प्रकाश दौंड या २६ वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.