एकाच संस्थेचे तीन वेगवेगळे अध्यक्ष, सचिव कसे? चौकशी समितीचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 06:49 PM2020-10-07T18:49:48+5:302020-10-07T18:50:19+5:30
Amravati News : आदिवासी विभागात १ कोटी ९५ लाखांचे अपहार प्रकरण, कौशल्य विकास प्रशिक्षणाचे घबाड
- गणेश वासनिक
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त अधिनस्थ धारणी, पुसद, औरंगाबाद, किनवट व कळमुनरी या पाच प्रकल्पांत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या नावे १ कोटी ९५ लाखांचा अपहार झाला आहे. मलिदा ओरपणारी संस्था एकच असताना तीन वेगवेगळे अध्यक्ष, सचिव असल्याची धक्कादायक बाब चौकशी समितीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे संस्थेची देयके काढताना अधिकारी, कर्मचाºयांची मिलिभगत होती, हे स्पष्ट होते.
औरंगाबाद येथील श्रीमंत महाराज महादेवराव सिंधीयाजी फाऊंडेशन, जाणता राजा चॅरिटेबल ट्रस्ट आणि परभणी जिल्ह्यातील लोहारा येथील क्रांतिज्योती प्रमिलाजी चव्हाण महिला मंडळ या संस्थेकडे आदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. सन- २०१२ ते २०१६ या दरम्यान प्रशिक्षणासाठी संस्थेसोबत करारनामा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात संस्थेने प्रशिक्षण कागदोपत्रीच राबविले. आदिवासी युवक, युवतींना रोजगार मिळाला नाही. करारनाम्यात वेगळी नावे तर, बँकेच्या व्यवहारात संस्थेचे अध्यक्ष, सचिव हे वेगवेगळे आहे. सचिव बदलल्यानंतरही धर्मदाय सहआयुक्तांकडे नोंद नाही. करारनाम्यात श्रीमंत महाराज महादेवराव सिंधीयाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश जाधव व सचिव शैलेश अंबोरे यांची नावे आहेत. औरंगाबाद येथील एसबीआय बँकेत ३१०७८०८२७२३ असे संयुक्त खाते दर्शविण्यात आले. मात्र, सचिवांचे १४ जुलै २०१४ रोजी निधन झाले असताना संस्थेने अधिकृत बदल न करता सचिवपदी परस्पर नात्यातील व्यक्तींची निवड केल्याची बाब चौकशी समितीने अंतरीम अहवालात नमूद केली आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागात अपहार करण्यासाठी बोगस संस्थांनी कसा धुमाकूळ घातला, हे दिसून येते.
राष्ट्रीयीकृत बँकेतून व्यवहाराला फाटा
वॉर्डबॉय, रुग्ण सहाय्यक, रिटेल मार्केटिंग व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, ईलेक्ट्रिक फिटींग, सुरक्षा गार्ड, आॅटोमोबाईल प्रशिक्षणाचे करारनामा करताना संस्थेने आर्थिक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात येतील, असे नमूद केले होते. मात्र, प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार हे बीड येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज को-आॅप. बँकेतून झाले आहे. संस्थेने भारतीय स्टेट बँकेतनू व्यवहाराला फाटा दिला आहे. एसबीआयमध्ये संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव तर, कोषाध्यक्ष म्हणून अंगद जाधव हे दोघे भाऊ आहे. अध्यक्षांनी संस्थेची रक्कम वैयक्तिक नावे असलेल्या बँक खात्यात पैसे वळती केले आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही बनावट
आदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण ही योजना कागदोपत्री राबविली. मात्र, प्रशिक्षणाथींंना दिलेले प्रमाणपत्रही बनावट असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि त्यावरील स्वाक्षरी बोगस असल्याचे कौशल्य विकास आयुक्तांनी सांगितले. खोटे प्रशिक्षणार्थी, ६१३ प्रशिक्षणार्थ्यांची बनावट यादी, प्रशिक्षण स्थळ खोटे दर्शवून अपहार करण्यात आला आहे.