माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:46+5:302021-08-23T04:15:46+5:30
दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सवाल, शंकांचे निरसन करताना बोर्डाचे अधिकारी हतबल अमरावती : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या ‘ना ...
दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सवाल, शंकांचे निरसन करताना बोर्डाचे अधिकारी हतबल
अमरावती : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या ‘ना परीक्षा, ना शाळा’ थेट निकालाने अनेक गुणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांमुळे ‘ढ’ विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांपेक्षा निकालात पुढे आहेत. त्यामुळे दहावी, बारावीच्या अनेक विद्यार्थिंनी माझ्यापेक्षा माझा मित्र, मैत्रिणीला जास्त गुण कसे, असा प्रश्न बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारत निकालावर बोटला आहे.
जिल्ह्यात दहावी, बारावीचा निकाल जंबो लागला आहे. काही शाळांनी १०० टक्के निकाल लागल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्या विद्यार्थांनी नववीपर्यंत नियमित वर्ग केले नाही, तेसुद्धा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने हुशार विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक हैराण झाले आहेत. दहावी, बारावीचे गुणी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी निकालावरून त्यांच्या मनात संशयकल्लोळ कायम आहे.
----------------------------
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...
यंदा मुलगी दहावीत होती. ऑनलाईन शिक्षण घेताना खासगी शिकवणीतून परीक्षांना सामोरे जाण्याची चांगली तयारी होती. मात्र, परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाने निकाल जाहीर झाला. नक्कीच मुलीचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
- जयश्री लांडे, पालक
---------------
यंदा बारावीची परीक्षा होईल, असे वातावरण होते. मात्र, शासनाने परीक्षा न घेता थेट निकाल जाहीर केला. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी काहीच अभ्यास केला नाही, तेदेखील पास झाले. शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
- मीनाक्षी करवाडे, पालक
------------
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
- यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा न घेता थेट निकाल जाहीर झाला. त्यामुळे गुणी विद्यार्थ्यांना माेठा फटका बसला आहे. पुनर्मूल्यांकनाची संधीदेखील नाही.
- शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दिलेले गुण आणि त्यानंतर बोर्डाचा निकाल हाच प्रमाण ठरला आहे.
- अनेक विद्यार्थी अभ्यास न करता उत्तीर्ण झाले. किंबहुना हुशार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुणदेखील मिळविण्यात आघाडी घेतली आहे.
------------------
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला जास्त गुण कसे?
- शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पाठविलेल्या गुणांच्या आधारे बोर्डाने गुणपत्रिका जारी केल्या आहेत. त्यामुळे कोण विद्यार्थी हुशार, कोण ‘ढ’ कसे ठरविणार.
- दहावी, बारावी काही विद्यार्थांनी वर्षभर पुस्तक देखील उघडून बघितले नाही, तेदेखील चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले, हा संशोधनाचा विषय आहे.
- विद्यार्थ्यांपेक्षा पालकवर्ग निकालावर चिंतातूर आहे. मात्र, शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केले असून, बोर्डाने केवळ निकाल जाहीर केला आहे.
--------------------------------
विद्यार्थी म्हणतात....
परीक्षेची उत्तम तयारी केली होती. मात्र, अंतर्गत मूल्यमापनाने घात केला आहे. ७२ टक्के गुणावर समाधान मानावे लागले. परीक्षाविना निकालाने नुकसान झाले आहे.
- चुटकी रोकडे, दहावी उत्तीर्ण विदयार्थिंनी
------------
बारावीनंतर अभियांत्रिकी करिअर करण्याचे स्वप्न होते. परीक्षांना सामोरे जाण्याची जाेरदार तयारी होती. पण, परीक्षा रद्द झाल्यात आणि मन खिन्न झाले. जे विद्यार्थी ४० टक्के गुण मिळवू शकत नव्हते त्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले.
- अमित देशमुख, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी