अस्वल पकडणारे वाघ कसा पकडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:53 PM2018-10-26T22:53:26+5:302018-10-26T22:53:57+5:30

धामणगाव रेल्वे व तिवसा तालुक्यात आठ दिवसांत दोन माणसे व पाच जनावरे ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी नव्हे, तर जनक्षोभ शांत करण्यासाठी शार्प शूटर्सचा बनाव करण्यात आल्याचे आता पुढे आले आहे.

How to catch a bear catch tiger? | अस्वल पकडणारे वाघ कसा पकडणार?

अस्वल पकडणारे वाघ कसा पकडणार?

Next
ठळक मुद्देशार्प शूटर्सची धूळफेक : नागरिकांच्या जिवाशी खेळ

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे व तिवसा तालुक्यात आठ दिवसांत दोन माणसे व पाच जनावरे ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी नव्हे, तर जनक्षोभ शांत करण्यासाठी शार्प शूटर्सचा बनाव करण्यात आल्याचे आता पुढे आले आहे. या कर्मचाऱ्यांना वाघासंदर्भात डेहराडून येथील प्रशिक्षण झालेले नाही. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये समन्वयाचा अभाव असून, बंदोबस्ताला तैनात वनकर्मचारी जखमी झाल्यास उपचार वा पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे दारूण चित्र आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील शेतकरी व अंजनसिंगी येथील शेतमजुराला नरभक्षक वाघाने ठार केले. यानंतर वनविभागाने युद्धस्तरावर या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम चालविली. मात्र, या मोहिमेचे वेगळेच वास्तव पुढे आले.
व्याघ्र प्रकल्पाचा अबोला
वाघांचे संरक्षण तसेच वाघांना जेरबंद करण्याकरिता व्याघ्र प्रकल्पाची मदत घेणे गरजेचे असते. मात्र, पाच दिवसांत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कर्मचारी वा अधिकारी घटनास्थळी फिरकला नसल्याचे पाहायला मिळाले. मागील पाच ते सहा दिवसांपासून व्याघ्र प्रकल्प व वनविभाग यांचा अबोला असल्याची माहिती पुढे आली आहे. मोर्शी भागात काही दिवसांपूर्वी वाघाचे बनावट कातडे पकडण्यात आले. तेव्हापासून या विभागांमध्ये शीतयुद्धाची स्थिती आहे.
राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाच्या आदेशाला तिलांजली
वाघाचा शोध घेण्याच्या मोहिमेत ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल, तर राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाची परवानगी घेणे गरजेचे असते. सहा दिवसांपासून ड्रोन कॅमेरा वापरात असला तरी याचा उपयोग मोहिमेला झालेला नाही. राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाच्या आदेशांचे उल्लंघन मात्र वनविभागाने केल्याची चर्चा आहे.
‘बदले पे बदला’ची चर्चा
पुलगाव येथे फटाके फोडून हा नरभक्षक वाघ अमरावती जिल्ह्यात हाकलण्यात आला. अशाप्रकारे धामणगाव, तिवसा या तालुक्यांतून थेट आर्वी, आष्टी तालुक्यांमध्ये हा वाघ हाकलण्यासाठी तिवसा येथे काही भागात फटाके फोडण्यात आल्याचे गंभीर माहिती बाहेर आली आहे. अनेक वनकर्मचाऱ्यांनी या बाबीला पुष्टी दिली.
कसा येईल अतिसंवेदनशील नरभक्षक?
वाघाची घ्राणेंद्रिये कमालीची संवेदनशील असतात. माणसाची ढेकर व सुटलेली दुर्गंधी तो हेरतो. तथापि, कमरेला पट्टा, मोबाइल, हातात घड्याळ, पायात बूट असलेल्या शार्प शूटरसह वनकर्मचाऱ्यांची उपस्थिती चपळपणाने हेरून वाघ पुन्हा परतत नाही. त्यामुळे मोहीम अपयशी ठरत आहे.
अमरावतीत घेतले प्रशिक्षण
मंगरूळ दस्तगीर, अंजसिंगी, ढाकूगगाव, तिवसा येथे सहा दिवसांत वनविभागाच्यावतीने पिंजरे लावण्यात आले. या पिंजऱ्यांमध्ये शार्प शूटरची व्यवस्था करण्यात आली. त्यांना डेहराडून येथील उच्च्स्तरीय प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, तर अमरावती येथे त्यांनी दोन-तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले.

शार्प शूटर असलेल्या या दोन कर्मचाऱ्यांना डेहराडून येथे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. अमरावती येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- अशोक कविटकर
सहायक वनसंरक्षक
अमरावती

Web Title: How to catch a bear catch tiger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.