पसार आरोपीचे मेडिकल झाले कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:52 PM2018-02-13T22:52:01+5:302018-02-13T22:52:24+5:30
रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील तस्करांकडून जप्त केलेल्या वाघाच्या बनावट कातडी प्रकरणी आरोपी पसार असल्याचे पंचनाम्यातून नमूद आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील तस्करांकडून जप्त केलेल्या वाघाच्या बनावट कातडी प्रकरणी आरोपी पसार असल्याचे पंचनाम्यातून नमूद आहे. तथापि, त्याची वैद्यकीय तपासणी झाली. त्यामुळे या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, मेळघाट टायगर क्राइम सेल संशयाच्या भोवºयात आहे.
मेळघाट टायगर क्राइम सेलने वाघाची बनावट कातडी जप्त केल्यानंतर वरूड, मोर्शी वनविभागाने पुढील कारवाई केली. वरुड, मोर्शीत पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी सुखदेव किसन धोटे (रा. देहुबारक, मध्यप्रदेश), हर्षल गुलाब गोहाड (रा. इसंब्री ता. वरूड जि. अमरावती) यांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांची मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी वैद्यकीय तपासणी झाली. मात्र, यातील एक आरोपी पसार झाल्याचे पंचनाम्यात दर्शविण्यात आले. वास्तविक, हर्षल गोहाड हे पसार झालेच नव्हते, तर त्यांना वनाधिकाºयांनीच बसवून ठेवले होते, अशी माहिती आहे. त्यांना पसार दाखविण्याची शक्कल कुणी लढविली, ते मध्यप्रदेशातून पसार झाले तर घटनेच्या दिवशी वैद्यकीय तपासणी कशी झाली, वाघाची कातडी बनावट असूनही गुन्हा दाखल करणे आणि अटकेची घाई मेळघाट टायगर क्राइम सेलने कशासाठी केली, हासुद्धा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. या प्रकरणातील गुंता आता वाढत चालल्याने मेळघाट टायगर क्राइम सेल विरुद्ध वनविभाग असे द्वंद्व रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, तपास अधिकारी राजेंद्र बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.