तंत्रनिकतेन परिक्षेवेळी मोबाईल आत गेला कसा?; पेपर व्हॉट्सॲपवर पाठविणाऱ्या तिघांविरूध्द गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: September 25, 2022 03:39 PM2022-09-25T15:39:01+5:302022-09-25T16:15:50+5:30
तपासणी यंत्रणा आरोपींच्या पिंजऱ्यात
अमरावती: तंत्रनिकेतनच्या कॉम्पुटर इंजिनिअरिंगमधील प्रोग्रामिंग विथ पायथन या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसॲपवर पाठविल्याप्रकरणी तीन विद्याथ्याविरूध्द परतवाडा पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अचलपूर नगरपरिषदेच्या तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. या ‘पेपर लिक’मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, परिक्षा केंद्रावरील खोलीत विद्याथ्याने मोबाईल नेला तरी कसा, यावर मोठा संशयकल्लोळ उठला आहे.
‘डू नॉट ब्रिंग इन टू द एक्सामिनेशन हॉल अ मोबाईल फोन ऑर ॲनी इलेक्ट्रानिक कम्युनिकेशन डिव्हाईस’ असे प्रत्येक परिक्षाकेंद्रावर लिहिलेले असते. अचलपूर नगरपरिषदेच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील परिक्षा केंद्रावर देखील त्या सुचनांच्या अनुषंगाने तपासणी झाली असेल. त्यामुळे परिक्षार्थी प्रशांत कांबळे याच्याकडे आढळलेल्या मोबाईल फोनने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्याची तपासणीच झाली नाही, की अन्य कुणी त्याला खोलीत गेल्यानंतर मोबाईल पुरविला, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी प्रशांत कांबळे (२०, रा. अमदापूर, ता. शेलू, जि. वर्धा), योगेश राठोड (२१, छोटा बाजार, परतवाडा) व इशानखान सौदागर (२१, अन्सारनगर, परतवाडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
काय घडले होते २४ सप्टेंबरला
महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाकडून (एमएसबीटीई) घेण्यात येणाऱ्या उन्हाळी २०२२ ची पुनर्परिक्षेचे नगरपरिषदेच्या तंत्रनिकेतन विद्यालयात परिक्षा केंद्र होते. तेथील आनंद धाकडे हे २४ सप्टेंबर रोजी ड्युटीवर असताना त्यांना परिक्षाकेंद्रावरील रुम नंबर ११७ मधील परिक्षाथ्याकडे मोबाईल आढळल्याची माहिती मिळाली. खोली पर्यवेक्षक आशिष नागे हे परिक्षार्थींना चेक करत असताना तेथील प्रशांत कांबळे या परिक्षार्थीजवळ मोबाईल आढळला. तो योगेश राठोड याचा असल्याचे कांबळे याने सांगितले.
काय आढळले मोबाईलमध्ये-
कांबळे याच्याकडील मोबाईल पाहिला असता त्यात तृतीय वर्ष कॉम्पुटर इंजिनिअरिंच्या प्रोग्रॉमिंग विथ पायथन या पेपरचे फोटो काढून ते त्याच विद्यालयातील विद्यार्थी इशान खान याला व्हॉट्सॲपने पाठविल्याचे दिसून आले. त्यानंतर कांबळे व इशान खान या दोघांना धाकडे यांच्या समक्ष उभे करण्यात आले. धाकडे यांनी देखील मोबाईल चेक केला. त्यावर तीनही आरोपींनी पेपरचे फोटो काढून ते परिक्षा केंद्राबाहेर प्रसिध्द केले. ते कृत्य परिक्षेची आचारसंहिता भंग करणारे असल्याची तक्रार धाकडे यांनी सायंकाळी नोंदविली.