अभियांत्रिकीच्या पुनर्मूल्यांकनात गुणवाढ कशी?, विद्यापीठात डाटा एन्ट्रीचा घोळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 09:56 PM2020-01-03T21:56:17+5:302020-01-03T21:56:31+5:30
विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत अगोदर अनुत्तीर्ण मात्र, पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण हा घोळ कायम आहे. अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला ७ गुणांचे पुनर्मूल्यांकनानंतर ५२ गुण दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठात ऑनलाइन कारभार रामभरोसे तर सुरू नाही ना, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते. त्यानुसार अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. मात्र, ते करताना आॅपरेटरकडून प्रचंड त्रुटी असल्याची बाब निदर्शनास आली आहे. उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांना काही विषयात अनुत्तीर्ण गुणपत्रिका मिळाली. मात्र, तो विषय चांगला सोडविला असताना नापास कसे, या प्रश्नाने विद्यार्थी गोंधळात पडले.
परिणामी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता, तो गोपनीय विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार गोपनीय विभाग पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जाची चाचपणी करून त्या विषयाची उत्तरपत्रिका पाहते. खरेच त्या विद्यार्थ्याला कमी गुण असल्यास त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाते, अन्यथा उत्तरपत्रिकेवर गुण जास्त असल्यास त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून उत्तरपत्रिकेवर असलेले गुण अंकित करून मूळ गुणपत्रिका देण्याची विद्यापीठाची नियमावली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना होणारा त्रास, मनस्ताप, कुटुंबीयांची नाराजी, आर्थिक नुकसान आदी बाबीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकीचे २३ महाविद्यालये असून, जवळपास बहुतांश महाविद्यालयांत पुनर्मूल्यांकनानंतर गुणवाढ झाल्याचे वास्तव आहे. डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या चुकीमुळे उत्तरपत्रिकेवरील गुण कमी टाकण्यात येत असल्याने आॅनलाईन गुणपत्रिका पाठविली जाते, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
पुनर्मूल्यांकनाच्या शुल्काचे काय?
विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करतात. त्याकरिता विद्यार्थ्यांना शुल्क मोजावे लागतात. त्यानंतरच पुनर्मूल्यांकन होते. मात्र, उत्तरपत्रिकेवर गुण अधिक असल्याचे निदर्शनास आल्यास पुनर्मूल्यांकन केले जात नाही. परंतु, विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी दिलेले शुल्क विद्यापीठ परत करते अथवा नाही, हा गंभीर विषय असल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्याला पुनर्मूल्यांकनाला सामोरे जावे लागत आहे, हे विशेष.
विद्यापीठ कायद्यानुसार १९/२००१ च्या सुधारणेअंती पुनर्मूल्यांकनाच्या चाचपणीनंतर उत्तरपत्रिकेवर गुण वाढीव असल्यास नव्याने गुणपत्रिक संचालकांना देता येते. आतापर्यंत अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ