मातृवंदन योजनेतील अनुदानासाठी अजून किती वर्ष वाट पाहणार?
By उज्वल भालेकर | Published: July 7, 2024 08:55 PM2024-07-07T20:55:59+5:302024-07-07T20:56:15+5:30
बाळ दोन वर्षांचे झाले, मात्र मातांच्या खात्यात अनुदान आलेच नाही
अमरावती: केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मातृवंदन योजनेला आपले उद्दिष्ट साधण्यात अपयश आल्याचे चित्र आहे. मातृवंदन योजना १.० मध्ये जिल्ह्यातील ८७ हजार २७३ गर्भवती मातांनी अर्ज केले होते. या मातांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ४३ कोटी ६३ लाख ६५ हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु, शासनाकडून फक्त ३५ कोटी ६९ लाख ९३ हजार इतक्याच निधीचे वाटप झाला असून, जिल्ह्यातील हजारो महिला अर्ज करूनही अनुदानापासून वंचित आहेत. यासंदर्भात आमदार रवि राणा तसेच आमदार यशोमती ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना केली आहे.
प्रधानमंत्री मातृवंदन योजना १.० ही केंद्र शासनाकडून १ जानेवारी २०१७ रोजी सुरू करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या बाळासाठी गर्भवती महिलांना तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपये डीबीटीमार्फत लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा होतील. यामध्ये नोंदणी केल्यावर हजार रुपये, सहा महिन्यांनी दोन हजार रुपये, तर बाळाच्या जन्मानंतर दोन हजार रुपये लाभार्थ्यांना मिळणार होते. जिल्ह्यात १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ८७ हजार २७३ मातांनी या योजनेसाठी अर्ज केले. अनेकांची बाळं दोन वर्षांची झाली, परंतु अजूनही अनुदानाचा दुसरा टप्पाही मिळालेला नाही. अशातच सप्टेंबर २०२३ पासून प्रधानमंत्री मातृवंदन योजना २.० सुरू केली. यामध्ये पहिल्या प्रसूतीसाठी दोन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येत आहेत, तर दुसरी मुलगी झाल्यास एकाच टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार २५० मातांची नोंदणी झाली. यातील ९ हजार ४०३ मातांना लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यात २ कोटी ८५ लाख ८१ हजार रुपये इतकी रक्कम वळती झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे पाच हजार महिला अजूनही वंचित आहेत. ही योजना केंद्राची असल्याने राज्यस्तरावर याची समस्या सोडविण्यात अडचणीचे जात असल्याने अर्ज करणाऱ्या महिलांकडून रोष व्यक्त होत आहे.
----------------------------
आशाला दिवसाला तीनच अर्ज भरण्याची मुभा
प्रधानमंत्री मातृवंदन योजना २.० साठी आशा सेविकांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा आहे. परंतु, यामध्ये एका दिवसाला एक आशा फक्त तीनच अर्ज भरू शकते. या अडचणीमुळेदेखील अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.