तिसरी लाट रोखणार कशी?, उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:10 AM2021-07-22T04:10:07+5:302021-07-22T04:10:07+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाच्या लढ्यात अग्रस्थानी राहत असल्याने ‘हेल्थ केअर वर्कर’चे लसीकरण १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरू झालेले आहे. मात्र, ...
अमरावती : कोरोना संसर्गाच्या लढ्यात अग्रस्थानी राहत असल्याने ‘हेल्थ केअर वर्कर’चे लसीकरण १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरू झालेले आहे. मात्र, सहा महिन्यांपासून ६,१७९ कर्मचाऱ्यांनी लसींचा दुसरा डोस घेतलेला नाही. यात बहुतेकांचा विहित कालावधीदेखील संपलेला आहे. आता तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाद्वारा मिळाल्याने कोरोना संसर्गाशी कसा देणार लढा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आलेला आहे. पुरवठ्यात सातत्य नसल्यामुळे यात खोळंबा येत आहे. यावेळी असणारा ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण होणे महत्त्वाचे असताना तसे झालेले नाही. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ४० टक्के कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. ऑफलाईन नोंदणीत काही त्रुटी असतीलही मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण झालेले नाही व त्यासाठी आरोग्य विभागाद्वारा सक्तीदेखील करण्यात आलेली नाही, हेच खरे वास्तव आहे.
बॉक्स
लसीकरणासाठी अजूनही काहीसी उदासीनता
* जिल्ह्यात किमान २१ हजारांवर हेल्थ केअर वर्कर आहेत. त्यापैकी २०,९१३ कर्मचाऱ्यांनी पहिला व १४,७३७ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही ६,१७९ कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे.
* अजूनही काही कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. याशिवाय ६ हजारांवर नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांची उदासीनता आता चिंतेचा विषय आहे.
* आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे वेळी ऑफलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला असताना पोर्टलवर पहिल्या डोसची नोंदणी झालेली आहे.
कोट
लसीकरणाची सक्ती केली जात नाही. साधारणत: सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. काहींचा दुसरा डोस बाकी आहे. ऑफलाईन नोंदणीत काहींनी दुसरा डोस घेतल्यावर त्याची पहिल्या डोसस्या नावाने नोंद झाल्याने काहीसा फरक दिसत आहे.
- डॉ दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
पाईंटर
हेल्थ केअर वर्कर : २१,२१०
फ्रंट लाईन वर्कर : ४३,१२३
पहिला डोस घेतलेले
हेल्थ लाईन वर्कर : २०,९१३
फ्रंटलाईन वर्कर : ४२,०३१
एकही डोस न घेतलेले
हेल्थ लाईन वर्कर : २९७
फ्रंट लाईन वर्कर : १,९०२