अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमच नाही तर नवीन शैक्षणिक धोरण लागू कसे?
By गणेश वासनिक | Published: June 2, 2023 07:47 PM2023-06-02T19:47:27+5:302023-06-02T19:47:41+5:30
सरकारने विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा निर्णय लागू केला आहे.
अमरावती : सरकारने विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्षाच्या सत्र एक आणि दोनचे अभ्यासक्रमच तयार केले नाहीत. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील हे या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन तो सोडवतील का, असा सवाल विद्यार्थी वजा शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विविध विद्याशाखांच्या विषयांचे अभ्यासक्रम अभ्यास मंडळ तयार करतात. एकदा अभ्यासक्रम तयार झाले की, ते विद्वत परिषदेच्या निर्णयार्थ पाठविले जातात. पुढे या अभ्यासक्रमाला व्यवस्थापन परिषदेत शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविले जातात आणि त्याच आधारे पदवी दिली जाते. परंतु, अमरावती विद्यापीठाचे कामकाज प्रभारींवर सुरू असल्यामुळे याचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागणार असल्याचे वास्तव आहे.
ना अभ्यास मंडळ, ना मंडळाचे चेअरमन
विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची लगबग सुरू आहे. पण विद्यापीठात ना अभ्यास मंडळाचे गठन झाले, ना मंडळाचे अध्यक्षपद ठरले. याशिवाय अभ्यास मंडळावर स्वीकृत सदस्यांचा पत्ता नाही. एकंदर ही प्रक्रिया राबविण्यास दीड ते दोन महिने लागतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे अभ्यास मंडळाचे गठन केव्हा होईल आणि सिलॅबस विद्यार्थ्यांच्या हाती पडेल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसमोर पेच
अमरावती विद्यापीठाचा अभ्यासक्रम तयार नाही. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमाच्या पॅटर्ननुसार प्रवेश घेणाऱ्या प्रथम वर्षातील बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बी. टेक. आदी विद्याशाखांमध्ये प्रवेश कसे घेणार, कोणता अभ्यासक्रम आहे, हे महाविद्यालयाच्या माहिती प्रवेशपत्रात नमूद नाही. एकंदरीत नवीन अभ्यासक्रमाबाबत ‘फ्रेमवर्क’च तयार झाली नाही, तर प्रत्यक्षात अभ्यासक्रम केव्हा, कसा तयार होणार, हे येणारा काळच सांगेल.