'तिला' विसरून कसे चालणार? अक्षय्य तृतीयेला रुबी श्वानाला पान ठेवून जपल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:36 AM2024-05-11T00:36:30+5:302024-05-11T00:37:14+5:30
मागल्या वर्षी रुबी झाली होती अनंतात विलीन
मनीष तसरे, अमरावती: अक्षय्य तृतीयेला आपल्यातून नेहमीकरिता निघून गेलेल्या आप्तेष्टांचा फोटो ठेवून त्यांना मिष्टान्न भोजनाचे पान टाकून त्यांच्या आठवणी जपत असतो. आतापर्यंत आपण घरातील मृत पावलेल्या सदस्यांना पान टाकले आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात उत्तमसरा गावात प्राणीप्रेमी सायंके परिवाराने त्यांच्या परिवारातील सदस्य "रुबी" श्वानाला मिष्टानांचा नैवेद्य दाखवून तिच्याबाबतचे प्रेम आणि ऋणानुबंध जपले आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातील ७ तारखेला रुबी ही 'टिक फिवर' या आजाराने मृत्युमुखी पडली होती. त्या वेळेस सायंके परिवाराने एखाद्या सौभाग्यवतीची सेवागत करावी तशी रुबी श्वानांच्या पार्थिवाची सेवागत केली होती.
तिच्या मृत शरीराला स्नान घालून अत्तर लावले होते. नंतर तिला हिरवी साडी नेसवून तिची नारळाने ओटी भरली होती. तिरडीवर तिचे पार्थिव शरीर सजवून तिची अंतिम यात्राही काढली होती. नाथ संप्रदायाच्या पद्धतीने रुबीला समाधी देण्यात आली होती. तेथून समोर काही दिवसांनी तिचा तिसरा दिवस करत गावातील बालकांना अन्नदान सायंके परिवाराने केले होते. रुबी गेल्यावर तिच्या स्मृतिदिनी या परिवाराने अमरावती येथील वसा संस्थेत उपचार घेत असलेल्या जखमी मुक्या प्राण्यांना एक दिवसाचे पोटभर अन्नदान केले होते.
शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळीच रुबीचा फोटो ठेवून तिला मिष्टान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला. रुबीचे पालक गजानननाथ सायंके सांगतात की, शुभम आणि भूषण या दोघे भावांनी रुबीला अगदी दोन महिन्याची असताना घरी आणले होते. तेव्हापासून आम्ही तिचा घरच्या सदस्याप्रमाणे सांभाळ केला. तिनेही आम्हाला तसाच जीव लावला. शाळेतून आल्यावर बॅग घरात नेणे, गाडीची चावी टेबलवर ठेवणे, सकाळी झोपेतून उठविण्याकरिता अंगावरचे पांघरून दाताने ओढणे, लहान बाळांची काळजी घेणे असे सर्व काम रुबी इमानेइतबारे करायची.
अक्षय्य तृतीयेला रुबीचे पान टाकल्यावर तिच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात. ती जिवंत असताना स्वयंपाक होईस्तोवर ती स्वयंपाक घराच्या समोर वाट बघत असायची. घरातील सर्व सदस्य जेवायला बसले की तिला सुद्धा तिच्या भांड्यात जेवण लागायचे. आज आम्ही तिच्या आवडीचे सर्व पदार्थ करून तिला पान वाढले. आजही आम्हाला घरात तिची कमी जाणवते. तिचा फोटो आम्ही अजूनही जपून ठेवला आहे. रुबी राहत असलेल्या खोलीत आजही तिच्या आवडीच्या, खेळायच्या वस्तू आम्ही जपून ठेवल्या आहेत. आमच्यासोबत ७ वर्षे राहिलेल्या रुबीला आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
- कविता आणि वनिता सायंके.