‘विज्ञान’ पदवीधर रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:59+5:30

१८ मे रोजी सकाळी आर्वी येथे आपल्या घरी रितिकचा मृत्यू झाल्याची माहिती मांत्रिक अब्दुल रहीम अ. मजिद याने मृताच्या पित्याला दिली होती. त्याच्यासह त्याची दोन मुले अ. जुनेद व अ. जमीर (तिघेही रा. विठ्ठल वार्ड, आर्वी, जि. वर्धा) यांनी उपचाराच्या बहाण्याने रितिकला आर्वी येथे नेले. मात्र, त्याला तंत्रविद्येने जिवानिशी ठार मारले, अशी तक्रार रितिकच्या पित्याने नोंदविली. १९ मे रोजी रात्री ८.५५ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

Hrithik, a science graduate, became a victim of Aghori Vidya! | ‘विज्ञान’ पदवीधर रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी!

‘विज्ञान’ पदवीधर रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक बेलपुरा येथील विज्ञान पदवीधर बळी ठरल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून याप्रकरणी आर्वी पोलिसांनी मांत्रिक व त्याच्या दोन मुलांविरुद्ध भादंविचे कलम ३०२, २०१ (पुरावा नष्ट करणे) व महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल केला. 
रितिक गणेश सोनकुसरे (२२, रा. बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. १८ मे रोजी सकाळी आर्वी येथे आपल्या घरी रितिकचा मृत्यू झाल्याची माहिती मांत्रिक अब्दुल रहीम अ. मजिद याने मृताच्या पित्याला दिली होती. त्याच्यासह त्याची दोन मुले अ. जुनेद व अ. जमीर (तिघेही रा. विठ्ठल वार्ड, आर्वी, जि. वर्धा) यांनी उपचाराच्या बहाण्याने रितिकला आर्वी येथे नेले. मात्र, त्याला तंत्रविद्येने जिवानिशी ठार मारले, अशी तक्रार रितिकच्या पित्याने नोंदविली. १९ मे रोजी रात्री ८.५५ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापूर्वी १८ मे रोजी रितिकचे पार्थिव अमरावतीत आणून शवविच्छेदन झाले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. विज्ञान पदवीधर व  मेडिकलमध्ये काम करणाऱ्या आपल्या मुलाचा आर्वीच्या त्या बाबाने अघोरी विद्येचा प्रयोग करून बळी घेतल्याचा आरोप रितिकच्या पित्याने ‘लोकमत’कडे केला. ‘टीम लोकमत’ने शुक्रवारी बेलपुरा येथील सोनकुसरे यांचे घर गाठून संपूर्ण वास्तव जाणून घेतले. 

म्हणे, तुमच्या घरी दोन जीन! 
१७ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास मांत्रिक अ. रहीम हा त्याच्या दोन मुलांसह बेलपुरा येथे आला. घराची तपासणी करून तुमच्या घरी दोन जीन आहेत, घरी सहा खड्डे करून पूजा करून बंदोबस्त करतो, अशी बतावणी करून त्याने दोन हजार रुपये घेतले. काही साहित्यदेखील आणले. मात्र, एक साहित्य नागपूरला मिळते. त्यामुळे आपण ही पूजा शनिवारी करू, असे म्हणत मांत्रिक त्याच्या दोन मुलांसह रितिकलादेखील आर्वीला त्याच्या घरी घेऊन गेला. 

माझ्यासोबत काही तरी दुर्घटना होणार
रितिकने १७ मे रोजी रात्री १०.४५ वाजता पित्याला फोन केला. आपल्याला कसेसे वाटत आहे, माझ्यासोबत काही तरी दुर्घटना होणार आहे, असे वाटत असल्याचे तो म्हणाला. १८ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास मांत्रिक अ. रहीमने रितिकचा मृत्यू झाला असून, त्याचे शव येथून घेऊन जा, असे फोन काॅलवर सांगितले. त्यावर सोनकुसरे हे पुतण्या व मित्रासमवेत आर्वीला पोहोचले. तेथे रितिक मृतावस्थेत पडला होता, तर त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणा दिसून आल्या.

अंगात मुंग्या येते अन् पोटात अग्निदाह 
अंगात मुंग्या येतात, पोटात पेट घेतल्यासारख्या वेदना होतात तसेच अंगात सुया टोचल्यासारखे वाटते, अशी तक्रार रितिकने पित्याकडे चार महिन्यांपूर्वी केली होती. त्याच्यावर पीडीएमसीमध्ये उपचारदेखील करण्यात आला. ती बाब रितिकच्या पित्याने त्यांच्या मानस बहिणीकडे कथन केली. तिने आर्वी येथील अ. रहीम नामक मांत्रिकाचे नाव सांगून फोन नंबरदेखील दिला. तीन महिन्यांपूर्वी रितिकला घेऊन त्याचे वडील अ. रहीमकडे पोहोचले. तेथे त्याने ताबीज, लिंबू व बिबे दिले. उतारादेखील काढला. दिलेले अंडे शहराच्या चौरस्त्यावर फेकण्यास सांगितले.

 

Web Title: Hrithik, a science graduate, became a victim of Aghori Vidya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.