वलगाव येथील आरागिरणीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:58+5:302021-05-06T04:12:58+5:30

आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या ८५ वाहनांचा वापर, १२ तासांपर्यंत आगडोंब कायम, लाखोंचे नुकसान अमरावती : वलगाव येथील चांदूरबाजार मार्गालगतच्या बाबानगरातील ...

A huge fire broke out at Aragirani in Valgaon | वलगाव येथील आरागिरणीला भीषण आग

वलगाव येथील आरागिरणीला भीषण आग

Next

आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या ८५ वाहनांचा वापर, १२ तासांपर्यंत आगडोंब कायम, लाखोंचे नुकसान

अमरावती : वलगाव येथील चांदूरबाजार मार्गालगतच्या बाबानगरातील नेहा वूड इंडस्ट्रीज नामक आरागिरणीला बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात लाकडांसह यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाले. आजूबाजूला लोकवस्ती असताना जीवितहानी मात्र झाली नाही. ही आग १२ तासांनंतर आटोक्यात आली. त्याकरिता अग्निशमनच्या ८५ वाहनांचा वापर करण्यात आला. आरागिरणीत लाकडांसह यंत्रसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, वनपाल विनोद ढवळे, महापालिका अग्निशमनचे अधीक्षक अजय पंधरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आग नुकसानाची पाहणी केली. बुधवारी रात्री १ वाजता सुरू झालेली आग दुपारी २ वाजेपर्यंत कायम होती. चांदूरबाजार, अचलपूर, अमरावती, बडनेरा येथून सुमारे ८५ अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले होते. ही आग आरागिरणी शेजारी असलेल्या काचेच्या बॉटल गोडाऊनमधून लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काचेच्या बॉटल रिकाम्या करणे, कॉपर जाळणे यातून लाकडाने पेट घेतला असावा, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. वनपाल विनोद ढवळे यांनी या आगीचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. मात्र, नुकसानीचा आकडा हा लाखोंच्या घरात असल्याचे ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-----------------

कोट

वलगाव येथील आग लागलेल्या आरागिरणीला भेट दिली. भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. लाकडासह यंत्रसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ही आग कशी लागली, याचा शोध घेण्यात येत आहे.

- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी

-----------------

कोट

रात्री दीड वाजताच्या सुमारास आरागिरणीला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन विभागाला मदतीसाठी फोन करण्यात आला. परंतु, अग्निशमनची वाहने विलंबाने आली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. लाकडाचा मोठा साठा, यंत्रसामग्री जळून खाक झाली.

- सैयद ईस्माईल सैयद बाबा, संचालक , नेहा वूड इंडस्ट्रिज वलगाव

Web Title: A huge fire broke out at Aragirani in Valgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.