वादळी पावसासह प्रचंड गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 11:58 PM2016-02-28T23:58:31+5:302016-02-28T23:58:31+5:30

रविवारी दुपारी साडेतीन वाजतादरम्यान वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्याला झोडपले.

Huge hailstorm with windy rain | वादळी पावसासह प्रचंड गारपीट

वादळी पावसासह प्रचंड गारपीट

Next

चांदूरबाजार तालुक्यात कहर : बाजार समितीत पाणीच पाणी, जिल्हाभरात पावसाची हजेरी
चांदूरबाजार (अमरावती) : रविवारी दुपारी साडेतीन वाजतादरम्यान वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्याला झोडपले. चांदूरबाजार, परतवाडा, चिखलदरा, यावली, चांदूररेल्वे परिसरातही पावसाने आकस्मिक हजेरी लावली. मात्र, चांदूरबाजार तालुक्यात तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या प्रचंड गारपिटीमुळे पिकांसह बाजार समितीतील शेतमालाची देखील हानी झाली. तालुक्यात सगळीकडे गारांचा खच साचला होता. आठवडी बाजारात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर बाजार समितीतील कोट्यवधींचा मालही पावसाने भिजला.
रविवारी दुपारपासून वातावरणात बदल झाला आणि क्षणार्धात सोसाट्याचे वारे, पाऊस आणि गारपीट सुरू झाली. रविवार हा चांदूरबाजारचा आठवडी बाजाराचा दिवस.
हजारो नागरिक या बाजारात ग्रामीण भागातून खरेदीसाठी येतात. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची त्रेधा उडाली. आठवडी बाजारातील भाजीपाला व धान्य विक्रेत्यांची या पावसामुळे प्रचंड हानी झाली. बाजारात आलेल्या ग्राहकांना मिळेल त्या ठिकाणी अर्धा तास आसरा घ्यावा लागला.
शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतदेखील धान्य बाजाराचा दिवस असल्यामुळे तूर, हरभरा, गहू हा माल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. बाजार समतीमध्ये रविवारी तब्बल आठ हजार पोत्यांची आवक झाली होती. यापैकी सहा हजार पोते धान्य पावसात चिंब भिजले. बाजार समितीच्या आवारात एक फूटपर्यंत पाणी साचल्याने विक्रीसाठी खाली टाकलेले धान्य अक्षरश: पाण्यावर तरंगत होते.

नुकसानीचे सर्वेक्षण सुरू
चांदूरबाजार : त्यावर गारांचा थरही जमा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेदेखील कोट्यवधींचे नुकसान झाले. शहरासह तालुक्यातील दिलालपूर, जसापूर, माधान, हैदतपूर, ब्राह्मणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगावसह अनेक गावांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसला. इतर गावांची माहिती महसूल यंत्रणेमार्फत प्राप्त झाली नाही. गारपीट व वादळी पावसात कांदा, गहू, संत्रा, हरभरा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्याकरिता महसूल यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करीत आहे. त्यांच्या अहवालानंतरच गारपीटग्रस्त गावांची संख्या व नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करीत आहे. त्यांच्या अहवालानंतरच गारपीटग्रस्त गावांची संख्या व नुकसानीचा आकडा अधिकृतरीत्या प्राप्त होईल.

७० वर्षांत पहिल्यांदाच प्रचंड गारा
मागील ७० वर्षांत कधी नव्हे तो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती परिसरातील वयोवृध्द नागरिक देत आहेत. ७० वर्षांपूर्वी छावणीची घरे असताना अशी गारपीट झाली होती आणि गारांचे थरच्या थर साचले होते, असे जाणकारांनी

चिखलदऱ्यातही गारपीट, परतवाड्यात मुसळधार
परतवाडा/चिखलदरा : रविवारी सायंकाळी ५.३० वाजतापासून अचलपूर-परतवाडा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चिखलदरा व परिसरात तुरीच्या आकाराची गारपीट झाली. सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस उशिरा रात्रीपर्यत सुरूच होता. वादळी पावसाने अचलपूर-परतवाडा शहरात अनेक होर्डिंग्ज कोसळले. हातगाडया धारकांची आणि उघड्यावर दुकाने थाटणाऱ्यांची या पावसामुळे एकच तारांबळ उडाली. विद्युत पुरवठादेखील काही काळ खंडित झाला होता. या पावसाचा गहू, कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. धामणगाव गढी, एकलासपूर, परसापूर, पथ्रोट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, या वादळी पावसाने चिखलदरा व परतवाडा-अचलपूर तालुक्यात कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

रविवारी झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील ३०० हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाची नासाडी झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी

Web Title: Huge hailstorm with windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.