राष्ट्रीय महामार्गावर ठिगळांचाही होणार का 'विश्वविक्रम'? सहा महिन्यांतच पडले खड्डे
By गणेश वासनिक | Published: December 9, 2022 10:38 AM2022-12-09T10:38:17+5:302022-12-09T10:48:24+5:30
Amravati-Akola highway : रस्ता दुभाजकाकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष, ब्रिज निर्मिती संथगतीने, अपघाताची शक्यता
अमरावती : अमरावती ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या वाटा गत १२ वर्षांपासून बिकटच आहेत. लोणी ते मूर्तिजापूरदरम्यान रस्ता डांबरीकरणाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद झालेल्या या राष्ट्रीय महामार्गावर सहा महिन्यांत जागोजागी ठिगळे लागली आहेत. तीन मोठे ब्रिज आणि ५१ पुलांची निर्मिती संथगतीने सुरू असून, काही ठिकाणी अपघातप्रवण स्थळ असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आता काय खड्ड्यांचा विश्वविक्रम करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती ते मलकापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ विदर्भातील जनतेच्या विकासाचा साथीदार ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. ७ जून २०२२ रोजी अमरावती ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी ते नवसाळपर्यंत विश्वविक्रमी रस्ता डांबरीकरणाची नाेंद करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांतच या महामार्गावर अनेक ठिकाणी ठिगळे लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुणे येथील राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या महामार्गाचे डांबरीकरण करताना वापरलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे स्पष्ट होते.
लोणी, नागझिरी येथे ब्रिज निर्मितीस्थळी भूलभुलैय्या
या महामार्गावर लोणी आणि नागझिरी फाटा येथे दोन मोठ्या ब्रिज निर्मितीचे कार्य सुरू आहे. मात्र, वाहनचालकांना कोणत्या दिशेने वाहनांची ने-आण करावी, यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे लोणी, नागझिरी हे दोन्ही पॉइंट अपघातप्रवणस्थळ झाले आहेत. कंत्राटदाराने येथे दिशादर्शक फलक लावावेत, अशी वाहनचालकांची मागणी आहे. गत तीन वर्षांपासून ब्रिज निर्मितीचे काम सुरू असताना ते अद्यापही पूर्ण झाले नाही, हे काम युद्धस्तरावर व्हावे, अशी महामार्गालगतच्या गावकऱ्यांची मागणी आहे.
दुभाजकाची स्थिती धोकादायक
मोठा गाजावाजा करून रस्ते डांबरीकरणाच्या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली; मात्र गत सहा महिन्यांपासून दुभाजकाची स्थिती धोकादायक आहे. दुभाजकात केवळ माती टाकण्यात आली असून, त्यात गवत, तण वाढले आहे. दुभाजकाला रंगरंगोटी नसल्याने रात्री ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. या महामार्गावर समांतर रस्ता ही मोठी समस्या असताना त्याकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष आहे.
मूर्तिजापूर येथील नागरिक त्रस्त
मूर्तिजापूर येथे ब्रिज निर्मितीचे कार्य संथगतीने होत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यापेक्षा ब्रिज नको, असे म्हणण्याची वेळ मूर्तिजापूरवासीयांवर आली आहे.