डेंग्यूचा बळी गेल्यास मनुष्यवधाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:11 AM2018-09-21T01:11:44+5:302018-09-21T01:13:03+5:30
डेंग्यू, स्वाईन फ्लू आदी साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने अधिक सजगतेने काम करणे आवश्यक असताना, अस्वच्छतेमुळे साथरोग पसरत असल्याच्या शेकडो तक्रारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डेंग्यू, स्वाईन फ्लू आदी साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने अधिक सजगतेने काम करणे आवश्यक असताना, अस्वच्छतेमुळे साथरोग पसरत असल्याच्या शेकडो तक्रारी आहेत. अशा स्थितीमुळे प्राणहानी झाल्यास जबाबदार अधिकारी- कर्मचाºयावर मनुष्यवधाचा गुन्हा मी स्वत: दाखल करेन, असा निर्वाणीचा इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी दिला. पालकमंत्र्यांच्या या तंबीमुळे महापालिका आयुक्त संजय निपाणे व आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांची पाचावर धारण बसली.
शहरात सर्वदूर पसरलेला डेंग्यू व अन्य साथ आजारांनी डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बुधवारी महापालिका यंत्रणेची बैठक घेतली होती. नैताम यांच्या ‘फेकू’ शैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी स्वच्छतेतील हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी दिली. कंटेनरच्या संख्येवर आक्षेप घेऊन त्यांनी त्याच अनुषंगाने गुरुवार सकाळपासून शहरातील प्रभागांची पाहणी केली. कचºयाने भरलेले कंटेनर व त्याभोवताल कचरा पाहून ते भडकले. रहाटगाव परिसरातून त्यांनी संपूर्ण शहराचा झंझावती दौरा केला. महापालिका आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) अजय जाधवसह नगरसेवक सुचिता बिरे, अ. नाजिम, शेख अफजल, सचिन रासने व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी प्रत्येक परिसरात जाऊन तेथील कंटेनर ठेवण्याच्या जागा, कचरा साठलेल्या जागा आदी प्रत्यक्ष पाहिले व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. संबंधित नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. कचरा साठलेल्या ठिकाणी जाऊन अस्वच्छतेसाठी जबाबदार कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक यांना कडक शब्दांत विचारणा केली. कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचाºयांना निलंबित, तर संबंधित कंत्राटदाराची देयक थांबविण्याचे सुस्पष्ट आदेश आयुक्तांना दिले. अमरावतीत जनावरे नव्हेत, तर माणसे राहतात, याची जाणीव ठेवा, असा सल्ला आयुक्तांना दिला. सात ते आठ कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कंटेनरमध्ये व शेजारी कचरा दिसल्यास त्यात अधिकाºयाला उतरविण्याची तंबी पालकमंत्र्यांनी बुधवारी दिली होती. त्या तंबीचा थेट परिणाम गुरुवारी सकाळी कंटेनरच्या ठिकाणी दिसून आला. प्रशांतनगर उद्यानाजवळील कंटेनरसह आॅटो गल्ली, गाडगेनगर, बालाजी प्लॉट, दीपार्चन, साबणपुरा, लालखडी, हमालपुरा, विधी महाविद्यालाय या भागांसह शहरातील अनेक ठिकाणचे कंटेनर गुरुवारी सकाळीच उचलण्यात आले. कंटेनरशेजारी साचलेला कचरा स्वच्छ करण्यात आला.
पालकमंत्र्यांची तंबी कामी आली. मात्र, महापालिकेने हा वेग कायम राखावा, अशी प्रतिक्रिया अमरावतीकरांमधून उमटली.
काम न करणाऱ्या कर्मचारी-कंत्राटदारांची यादी
शहरातील स्वच्छता नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे त्याचे गांभीर्य ओळखून महापालिका यंत्रणेने दक्षता घ्यावी, कर्तव्यपालन न करणा-या कर्मचारी व कंत्राटादारांची यादी करून तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. शेगाव नाका, रहाटगाव, नवसारी, साईनगर, सातुर्णा, न्यू सातुर्णानगर, गडगडेश्वर, अंबाविहार, पार्वतीनगर, रवीनगर, शेगाव नाका, आशियाड कॉलनी, इमामनगर, अल हिलाल कॉलनी, लालखडी यासह विविध परिसरांत जवळजवळ संपूर्ण शहरभर पालकमंत्र्यांनी अथकपणे पाहणी केली.
दोषींवर कारवाईचे निर्देश
सातुर्णा भागात पालकमंत्री पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी अस्वच्छतेबाबत संबंधित कंत्राटदार, कर्मचारी व स्वच्छता यंत्रणेकडे तक्रार केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नसल्याचे न्यू सातुर्णानगर येथील सुनंदा चिखलकर यांनी सांगितले. त्यावर संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
कंपोस्ट डेपोला भेट रजिस्टरची तपासणी
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दुपारी ३ च्या सुमारास सुकळी येथील कचरा डेपोला भेट दिली. दिवसभरात येथे किती कंटेनर येतात, याची माहिती घेतली व तेथील रजिस्टरही तपासले. प्रत्यक्षात किती कंटेनर दिवसभरात कचरा वाहून आणतात, रजिस्टरमधील नोंदी व वाहनफेºया यात तफावत आहे किंवा कसे, हे तपासून कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले. दुपारी २ नंतर शहरात एकही गाडी फिरत नसल्याच्या तक्रारी आहेत. कंटेनरच्या नोंदी नियमित तपासत राहणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदाराचे चोचले पुरविल्यास गाठ माझ्याशी असल्याची तंबी त्यांनी महापालिका यंत्रणेला दिली.
दोन ‘एसआय’च्या निलंबनाचे आदेश
लालखडी येथील संजय घेंगट, सातुर्णा येथील नीलेश गाडे या स्वास्थ्य निरीक्षकांना निलंबित करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. या भागात नाल्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली. सुकळी कम्पोस्ट डेपोतील कनिष्ठ लिपिक नरेश उईके यांच्यावर निलंबनाची तलवार आहे, तर चार ते पाच कर्मचाºयांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे.