‘त्या‘ डॉक्टरांच्या माणुसकीलाही फुटला पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:50+5:302021-07-24T04:09:50+5:30
वरूड : नजीकच्या राजुरा बाजार येथील एक गरीब शेतमजूर स्वतःचे घराचे छपरावरील कवेलू शिवण्याकरिता गेले असता अचानक घरावरून ...
वरूड : नजीकच्या राजुरा बाजार येथील एक गरीब शेतमजूर स्वतःचे घराचे छपरावरील कवेलू शिवण्याकरिता गेले असता अचानक घरावरून खाली पडले. यात पाय मोडल्याने उपचाराकरिता पैसा नसल्याने घरातच पडून होते. ही बाब दी ग्रेट मराठा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना माहिती होताच त्यांना वरूडच्या डॉ. महेंद्र राऊत यांच्याकडे दाखल केले.
राजुरा बाजार येथील एक गरीब शेतमजूर स्वतःचे घराचे छपरावरील कवेलू शिवण्याकरिता गेले असता अचानक घरावरून खाली पडले. यामध्ये पायाचे हाड मोडले. यावर ऑपरेशन हेच पर्याय राहिल्याने पत्नीने पती विनोद वायकर यांना वरूड येथे दवाखान्यात आणले. पायाचे ऑपरेशनचा खर्च ५५ हजार रुपये येणार असल्याचे सांगितले. परंतु, रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शक्य नव्हते. त्यामुळे एक महिना घरातच पडून राहिले. याबाबत दी ग्रेट मराठा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना कळले. केवळ पैशामुळे रुग्ण मरणयातना भोगतोय, हे राजुरा बाजार मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष शैलेश बोहरुपी आणि नीलेश साबळे यांनी रुग्ण डॉ. महेंद्र राऊत यांचे मातोश्री हॉस्पिटल यांना कॉल करून रुग्णाविषयी माहिती दिली. तेव्हा तुम्ही रुग्णाला घेऊन या, कमी खर्चात करू '' असे ते म्हणाले. रुग्णालयात रुग्ण आणून ऑपरेशन केले. ऑपरेशनसाठी लागलेल्या साहित्याचे ४० हजार रुपये खर्च होईल असे सांगितले. तेव्हा मराठा फाउंडेशन सदस्यांनी १० हजार रुपये जमा केले आणि डॉक्टरांना दिले. उर्वरित रक्कम आणून देतो म्हणून निघताना रुग्णाचे पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र काढून २५ हजारात विकण्याची तयारी दर्शविली. हा विषय डॉक्टरांना माहिती होताच डॉ. राऊत यांनी ते मंगळसूत्र कार्यकर्त्यांच्या हातातून घेऊन रुग्ण दिनेश वायकर यांच्या पत्नीच्या हातात दिले व म्हटले '' हे माझ्यावतीने तुमचा भाऊ समजून राखीची भेट म्हणून ठेवा'' आणि गहिवरल्या अवस्थेत माणुसकीलाही पाझर फुटला. मात्र, एका बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणून तिच्या पतीच्या पायाची शस्त्रक्रिया करून स्वतः रस्त्यावर पायाने चालू लागल्याचा आनंद आणि समाधान डॉक्टरांसह दी ग्रेट मराठा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.