दिवसा आर्द्रता, रात्रीच्या थंडीने पुन्हा बोंडअळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 09:52 PM2018-10-31T21:52:34+5:302018-10-31T21:53:09+5:30
सध्या दिवसाच्या तापमानात आर्द्रतेचे प्रमाण जास्त व रात्रीच्या थंडीत झालेली वाढ ही स्थिती बोंडअळीस पोषक असल्याने जिल्ह्यासह विदर्भात प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकशास्त्र विभाग व गुलाबी बोंडअळी सनियंत्रण समितीमधील कीटकशास्त्रज्ञांच्या दोन दिवसांतील सर्वेक्षणामध्ये हिरव्या बोंडात १० टक्क््यांच्या वर प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे कृषी विद्यापीठाने सर्व जिल्ह्यांना अलर्ट दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सध्या दिवसाच्या तापमानात आर्द्रतेचे प्रमाण जास्त व रात्रीच्या थंडीत झालेली वाढ ही स्थिती बोंडअळीस पोषक असल्याने जिल्ह्यासह विदर्भात प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकशास्त्र विभाग व गुलाबी बोंडअळी सनियंत्रण समितीमधील कीटकशास्त्रज्ञांच्या दोन दिवसांतील सर्वेक्षणामध्ये हिरव्या बोंडात १० टक्क््यांच्या वर प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे कृषी विद्यापीठाने सर्व जिल्ह्यांना अलर्ट दिला.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशी, हलक्या ते मध्यम जमिनीतील पाण्याचा ताण पडलेल्या कपाशीच्या तुलनेत संरक्षित ओलिताच्या कपाशीत व भारी जमिनीमधील हिरव्या कपाशीमध्ये जास्त आढळून आलेला आहे. या अळीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान २९ ते ३२ अंश सेल्सीअस व रात्रीचे तापमान ११ ते १४.५ अंश सेल्सीअस, तर दिवसाची आर्द्रता ७१ ते ८० टक्के, तर रात्रीची आर्द्रता २६ ते ३५ टक्के असणे अत्यंत पोषक आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या ते आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दिवसाचे सरासरी तापमान ३५ अंश असल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. मात्र, आता तापमान जसजसे कमी होईल तशी हिरव्या बोंडातील गुलाबी अळीच्या प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली.
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी आठवड्याला नियमित सर्वेक्षण करून फेरोमोन सापळ्यामधील पतंग मोजून नष्ट करावे. सापळ्यामधील कामगंध वड्या (ल्यूर) वेस्टनावरील सुचनेनुसार बदलाव्या. फेरोमेन सापळे लावून (एकरी १५ ते २० याप्रमाणे) मोठ्या प्रमाणात अडकलेले पतंग नष्ट करणे महत्त्वाचे आहे.
आठवड्याला शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी एकरी २० झाडे निवडून त्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले आणि बाहेरून किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळ्यांची संख्या मोजावी. यापैकी दोन किडक बोंडे किंवा दोन पांढुरक्या, गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी समजून शिफारसीच्या कीटकनाशक फवारणी करण्याचे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख अनिल ठाकरे व कृषी विकास अधिकारी कुरबान तडवी यांनी केले.
असे करा तातडीचे व्यवस्थापन
अळीच्या प्रादुर्भावास नुकतीच सुरुवात झाली असल्यास ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही ३० मिलि किंवा डल्टामेथ्रीन २.८० टक्के प्रवाही १० मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव जास्त आहे, तेथे मिश्र कीटकनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझालॉस ३५ टक्के + डेल्टामेथ्रीन १ टक्के - १७ मिलि किंवा क्लोरेट्रेनिलीप्रोल ९.३ टक्के + लॅब्डासायहॅलोथीन ४.६ टक्के - ५ मिलि किंवा इंडॉक्झीकार्ब १४.५ टक्के + अॅसीटामाप्रीड ७.७ टक्के - १० मिलि किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के - २० मिलि याचा वापर करावा.
ओलिताच्या कपाशीत प्रादुर्भाव जास्त
जेथे संरक्षित ओलिताची सोय आहे, तेथे हलके पाणी देऊनच फवारणी करावी. तत्पूर्वी वेचणी महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. तीन ते चार वेचण्या झाल्याबरोबर कपाशीची उलंगवाडी करावी.
कापूस साठवणूक व संकलन केंद्रे, जिनींग मिल्स ठिकाणी कापूस संकलन सुरू झाले आहे. तिथे जिनिंगनंतर चाळणीवरच्या अळ्या, कोष, कवडी व खराब कापूसाची त्वरित विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे.