बडनेऱ्यात पाच तास थांबली ‘हमसफर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:40 AM2019-08-08T01:40:56+5:302019-08-08T01:41:16+5:30
गंगानगर ते त्रिचरापल्ली हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेस पावसाच्या धोक्यामुळे बडनेरामार्गे वळविण्यात आली. या आकस्मिक बदलांची कल्पना नसलेल्या पाचशे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला. काही प्रवाशांनी ही गाडी रोखून धरण्याचादेखील प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : गंगानगर ते त्रिचरापल्ली हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेस पावसाच्या धोक्यामुळे बडनेरामार्गे वळविण्यात आली. या आकस्मिक बदलांची कल्पना नसलेल्या पाचशे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला. काही प्रवाशांनी ही गाडी रोखून धरण्याचादेखील प्रयत्न केला. संतप्त प्रवाशांना पाच तासानंतर दुसºया गाडीने भुसावळमार्गे पुण्याला पाठविण्यात आले. त्यानंतरच रेल्वे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. सदरचा प्रकार बुधवार, ७ आॅगस्ट रोजी घडला.
राजस्थानमधील गंगानगर येथून निघालेली हमसफर एक्सप्रेस कल्याणमार्गे केरळमधील त्रिचरापल्ली येथे जाते. ही गाडी बडनेरामार्गे जात नाही. मात्र, मुसळधार पावसामुळे या गाडीला भुसावळहून बडनेरापर्यंत आणण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही सूचना न देता आपल्याला एवढ्या दूर का आणले, याचा संताप व्यक्त करीत हमसफर एक्स्प्रेसमधील ५०० प्रवाशांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ घातला. हमसफर एक्स्प्रेस मूळ मार्गाकडे वळवा, असा त्यांचा आग्रह होता. सकाळी साडेनऊ वाजता ही गाडी बडनेºयात पोहोचली. प्रवाशांच्या गोंधळावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात पाच तास ही एक्स्प्रेस बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबून होती. यादरम्यान प्रवाशांनी इतर गाड्या जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलिसांना पाचारण करण्यात आला. अखेर दुपारी २ च्या महाराष्टÑ एक्सप्रेसने प्रवाशांना भुसावळ व पुण्याकडे रवाना करण्यात आले. स्टेशन प्रबंधक पी.के. सिन्हा, वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, पोलीस निरीक्षक शरद कुलकर्णी, रेल्वे बलाचे सहायक निरीक्षक एस.जी. वानखडे, पी.के. भाकर आदी अधिकाऱ्यांनी तणाव निवळण्यासाठी परिश्रम घेतले. प्रवाशांना रवाना केल्यावर हमसफर एक्स्प्रेस मार्गस्थ झाली.
सूचना मिळाली नाही
गंगानगर येथून निघालेल्या हमसफर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना गाडी वळविण्यात येणार असल्याची सूचना दिलीच नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या होत्या. जीपीएस, गाडीतील डिस्प्ले बंद होते. सुरतनंतर गाडीत टी.सी.देखील नसल्याचे प्रवाशांनी बोलून दाखविले.