दिवाळीच्या तोंडावर डिझेलची शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:56+5:30
पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्यामुळे वाहन असलेल्यांचा कौटुंबिक खर्च वाढला आहे. प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. प्रवास महागला आहे. मालवाहतूक महागल्यामुळे धान्यासह किराणा आणि भाजीपाल्याच्या किमती आधीच वाढल्या आहेत. याने कौटुंबिक खर्चावर मर्यादा आल्या आहेत.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : डिझेल दिवाळीच्या तोंडावर शंभरी गाठणार असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. यात प्रवासासह मालवाहतूक महागली आहे. गहू, तांदूळ, तूप, तेलासह विविध प्रकारच्या डाळी, शेंगदाणे आदी किराणा साहित्यदेखील महागले असून, ड्रायफ्रूट्स आधीच महागलेले आहेत. भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यातच दिवाळीच्या तोंडावर गृहिणींचा खर्च वाढणार आहे. हा सर्व प्रकार वाहतूक खर्चामुळे घडत आहे. शासनाने पेट्रोल, डिझेलवरील टॅक्स कमी केल्यास किमान दर कायम राहील. त्यामुळे वाहतूक खर्चाचा बोजा कमी होऊन इतर वस्तूंचे दर कायम राहण्यास मदत होईल, असे मत आहे.
मालवाहतूक महागली
- डिझेलवाढीमुळे वाहतूक खर्च २० टक्क्यांनी महागला आहे. गहू मध्य प्रदेश, गुजरात, पंजाबमधून येतो. तांदूळही इतर राज्यातून आणला जातो. कपडा सुरत, इंदूरहून, तेल इटारसी, बैतूलहून, नारळ, चहा किराणा बाहेरून येत वाहतुकीमुळे किमती वाढल्या आहेत.
हे महागले
- खाद्यतेल, गहू, तांदूळ, तूप, शेंगदाणे, चहा, डाळी, साखर, किराणा, ड्रायफ्रूट्स, गॅस सिलिंडर महागले आहे. कांदे, कोथिंबीर, टमाटे, कोहळे, वांगी, बरबटी, ढेमसे असा हिरवा भाजीपाला महागला आहे.
हे आणखी महागणार
- खाद्यतेल, गहू, तांदूळ, तेल, तूप, शेंगदाणे, चहा, डाळींसह ड्रायफ्रूट्स, गूळ, कांदे आणि भाजीपाल्याची बाहेरून वाहतूक होत असल्याने आणखी महागणार आहे.
पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्यामुळे वाहन असलेल्यांचा कौटुंबिक खर्च वाढला आहे. प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. प्रवास महागला आहे. मालवाहतूक महागल्यामुळे धान्यासह किराणा आणि भाजीपाल्याच्या किमती आधीच वाढल्या आहेत. याने कौटुंबिक खर्चावर मर्यादा आल्या आहेत.
- संध्या बोंडे, अमरावती
डिझेल पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा फटका मध्यमवर्गीयांना बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असल्यामुळे एक गृहिणी म्हणून घरखर्च सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
- सुलभा उभाड, भिलोना.