झिरो बजेट शेतीसाठी शेकडो शेतकरी गुरुकुंजात
By admin | Published: June 6, 2016 12:14 AM2016-06-06T00:14:56+5:302016-06-06T00:14:56+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मागील काही वर्षांपासून संकट ओढवले आहे.
सुभाष पाळेकरांचे मार्गदर्शन : गुरुकुंज मोझरी येथे पाच दिवसीय शिबिर
तिवसा: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मागील काही वर्षांपासून संकट ओढवले आहे. सुभाष पाळेकर यांनी ‘झिरो बजेट शेती’ ही लोकचळवळ त्यासाठी उभी केली. शेतकऱ्यांना खरीप पिकांपूर्वी हा प्रयोग लाभदायक ठरावा यासाठी गुरुकुंज मोझरी येथील अध्यात्म गुरुकुल येथे १ ते ५ जूनपर्यंत पाच दिवसीय राज्यस्तरीय शिबीर घेण्यात आले. शिबिरात बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
सततची नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट शेती हा प्रयोग त्यांना या संकटातून वाचविणारा असून यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी म्हणून हे निवासी पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात सुभाष पाळेकर यांनी गुरुकुल येथे दररोज दोन सत्रात झिरो बजेट ही शेती कशी करायची आणि ती आजच्या जीवनात शेतकऱ्यांना कशी फायदेशीर ठरेल?, याची इत्यंभूत माहिती या शिबिरातून दिली.
अतिशय कमी खर्चात चांगले उत्पादन देणारी शेती या प्रयोगातून केल्यास नक्कीच शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असा आशावाद त्यांनी या शिबिरातून व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक शंकांचे समाधान देखील करण्यात आले. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
(प्रतिनिधी)