सरत्या वर्षात व-हाडात शेतकरी आत्महत्यांची हजारी पार; १,१५३ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 05:16 PM2017-12-29T17:16:18+5:302017-12-29T17:16:44+5:30
सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
- गजानन मोहोड
अमरावती : सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या काळात रोज तीन शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याने आता वरवरची मलमपट्टी नव्हे, दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.
विदर्भात अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील वर्धा हे सहा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणा-या शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शी अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व त्याच्यावरील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१७ पावेतो १४ हजार ६७७ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये ६ हजार ५५९ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र, ७ हजार ९९६ अपात्र, तर १२२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
यंदाच्या वर्षात १,१५३ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात ९५, फेब्रुवारी १०७, मार्च ११२, एप्रिल ८३, मे ९६, जून ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८ व २७ डिसेंबरपर्यंत ६५ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.
बुलडाणा आघाडीवर
२०१७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या जिल्ह्यात यंदा ३०५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले; अमरावती २६१, यवतमाळ २३७, अकोला १६५, वाशिम ७२ व वर्धा जिल्ह्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली.
कर्जमाफीच्या २०० दिवसांत ६६० शेतकरी आत्महत्या
शेतक-यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी शासनाने जून महिन्यात कर्जमाफी जाहीर केली. मात्र, यामध्येही शेतकºयांना दिलासा मिळाला नसल्याची बाब आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या २०० दिवसांच्या कालावधीत ६६० शेतकºयांनी मृत्यूचा फास ओढला. यामध्येही खरिपाच्या पेरणीपश्चात आॅगस्ट महिन्यात ११९, तर सप्टेंबर महिन्यात १२१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.