शेकडो वारकऱ्यांचे पंढरपूरकडे कूच
By admin | Published: June 29, 2017 12:24 AM2017-06-29T00:24:01+5:302017-06-29T00:24:01+5:30
पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले.
पहिली विशेष रेल्वे रवाना : विठू नामाचा गजर, भक्तांचा उत्साह
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले. विठुरायाच्या दर्शनाच्या अनामिक ओढीने धुंद झालेल्या वारकऱ्यांच्या उत्साहामुळे परिसरात देखील चैतन्य निर्माण झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली होती.
त्यानुसार मध्य रेल्वे विभागाने पंढरपूर रेल्वे विशेष गाडी विठ्ठल भक्तांसाठी सुरू केली आहे. नया अकोला येथून बुधवारी रेल्वे बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला सुरूवात करण्यात आली.
गुरूवार २९ जून रोजी दुसऱ्या रेल्वेला दुपारी दोन वाजता महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केले जाईल. पंढरपूरकडे आज रवाना झालेल्या गाडीचे चालक म्हणून एस.वाय.कोहाडे तर सहचालक म्हणून एन. चंद्रा होते. गाडीचे गार्ड उमेश राम होते. पंढरपूरकडे रवाना झालेल्या विशेष गाडीसाठी पहिल्या दिवशी १५४ तिकिटांची विक्री करण्यात आली असून १९५ प्रवासी रवाना झाल्याची नोंद आहे.
पहिल्या दिवशी २९ हजार ३० रुपयांचे तिकिट विक्रीतून उत्पन्न मिळाले आहे. नया अमरावती रेल्वे स्थानकाहून गुरूवार २९ जून त्यानंतर १, वन२ जुलै रोजी दुपारी २ वाजता विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना होईल. पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन २९, ३० जून तर १ व २ जुलै रोजी १० वाजून ४० मिनिटांनी ही गाडी अमरावतीसाठी परतीचा प्रवास करेल. पंढरपूर विशेष रेल्वे गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, खामगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, खुर्दवाडी, पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी २० डब्यांची असून यात १८ डबे सामान्य व आरक्षण तर दोन डबे एसएलआरचे आहेत.
आज सुटणार दुसरी विशेष गाडी
विठ्ठलभक्तांना घेऊन उद्या गुरूवारी दुपारी दोन वाजता दुसरी विशेष रेल्वे रवाना होणार आहे. आरक्षण व विनाआरक्षण अशी रेल्वे गाडीत सोय आहे. वारकऱ्यांसाठीच ही रेल्वे सुरु करण्यात आली आहे. रेल्वेने प्रवास करताना तिकिट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांनी केले आहे.