विस्तार अधिकाऱ्यांवर उपासमारीची पाळी
By admin | Published: November 18, 2015 12:29 AM2015-11-18T00:29:23+5:302015-11-18T00:29:23+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत चौदाही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक यांचे दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही.
वेतन थकले : एनआरएलएम आंदोलनाच्या तयारीत
अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत चौदाही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक यांचे दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे महिला बचत गटाचे काम असून महिला बचत गटाला प्रशिक्षण देणे, व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे व मार्गदर्शन करणे अशा विविध स्वरुपाची कामे आहेत. मागील वर्षापासून विस्तार अधिकारी (एनआरएलएम) व तालुका समन्वयक यांना नियमित वेतन मिळत नाही. याबाबत प्रकल्प संचालकांना अनेकदा निवेदन दिलीत. परंतु जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने याची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक आर्थिक विवंचनेत असून कौटुंबिक गरजा सोडविण्यासाठी त्यांना अडचण जात आहे. गृहकर्जाचे, जीवन विमा व इतर कर्जांच्या हप्त्यावरील व्याजाचा बोजा वाढत आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २३ पासून सभाबंद व अहवालबंद आंदोलनाचा इशारा विभागीय संघटक सतीश खानंदे, संदीप देशमुख, प्रल्हाद तेलंग, सुधाकर उमक, मिलिंद ठुणुकले, विठ्ठल जाधव, प्रेमानंद मेश्राम, प्रवीण वानखडे, सुशील माडीवाले, सुधाकर भिवगडे, ईश्वर सातंगे, महादेव कासदेकर, सुनील गवई, अन्ना ठाकरे, अनिल फुटाने, अशोक बनसोड, मीना मसतकर, पी.बी. नान्हे, साळवे, भुयार, भांडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)