दर्यापूर तालुक्यात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:23+5:302021-05-06T04:13:23+5:30
तितर-बटेरची सर्रास विक्री, जोडीचे दर दीडशे ते दोनशे रुपये अनंत बोबडे, येवदा : वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार करणे हे ...
तितर-बटेरची सर्रास विक्री, जोडीचे दर दीडशे ते दोनशे रुपये
अनंत बोबडे, येवदा : वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा असताना दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पक्ष्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय झाली आहे. शिकाऱ्यांनी तितर-बटेर पक्ष्यांना जाळ्यात अडकवून त्यांची दामदुप्पट दराने विक्री सुरू केली आहे.
ग्रामीण भागात तितर-बटेर पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात असतात. विविध पक्ष्यांना पोट भरण्यासाठी ज्वारी, बाजरी हे धान्य लागते. परंतु, सध्या परिसरात शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे ज्वारी, बाजरीची पेरणी कमी केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत परिसरात ओलीत असलेल्या भागाकडे या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. बागायती क्षेत्रातील भाजीपाल्यावर असलेले कीटक हे पक्षी टिपतात. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन पारधी समुदायातील लोकांनी पक्ष्यांना जाळ्यात अडकविण्यासाठी डाबके तयार केले आहेत. जाळ्यात तितेर-बटेरसह अन्य पक्षीसुद्धा आढळतात. तितर-बटेरचे मांस इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक स्वादिष्ट लागत असल्याने शहरातील या पक्ष्यांना अधिक मागणी असते. शिकारी या पक्ष्यांना जाळ्यात अडकल्यानंतर त्याची बाजारात विक्री करतात.
दर्यापूर तालुक्यातील बहुतांश गावातील बाजार ओट्यावर तितर-बटेरच्या जोड्या विक्रीसाठी असतात. एका जोडीची किंमत दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत असते. शिकारी पैशाच्या लालसेपोटी शहरातील काही निवडक हॉटेलला तितर-बटेरचा पुरवठा करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या परिसरात हरिण, ससा, रानडुक्कर, हरवेल, मोर, टिटवी, पाणकोंबडी, बगळे या प्राण्यांची शिकार करण्याचेही प्रमाण तालुक्यात अधिक प्रमाणात वाढले आहे. पक्ष्यांची शिकार व विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कारवाईची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.