शिकार केली श्वानाने, डंका बिबट्याचा नागरिक धास्तावले : दिवस-रात्र वनविभागाची पाळत
By admin | Published: March 25, 2015 11:59 PM2015-03-25T23:59:37+5:302015-03-25T23:59:37+5:30
वडाळी एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिक धास्तावले आहेत.
अमरावती: वडाळी एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिक धास्तावले आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजता श्वानाने एका वराहाची शिकार केली मात्र, बिबट्यानेच शिकार केल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या होत्या. बिबट्याबद्दल किती भयाचे वातावरण आहे, हे यावरून स्पष्ट होते. या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली आहे. पाचशे क्वॉर्टर परिसरात अहोरात्र पाळत ठेवली जात आहे. चांदूररेल्वे मार्गावरील ५०० क्वॉर्टर परिसरात बिबट्याच्या खाणाखुणा आढळल्यानंतर नागरिक धास्तावले आहेत. मंगळवारी सकाळी सुध्दा काही महिलांनी बिबट दृष्टीस पडल्याचा दावा केला. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने देखील आता बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. सोमवारपासून शिकार प्रतिबधंक पथकाचे पी.टी. वानखडे, शेख वाहब, अमोल गावराने, फिरोज खान, अमित शिंदे, सतीश उमक, चंदू ढवळे, मनोज ठाकूर यांचे पथक परिसरात गस्त घालत आहे. तरीही बुधवारी सकाळी बिबट्याने वराहाची शिकार केल्याची चर्चा होती.मात्र, त्या वराहाची शिकार बिबट्याने नव्हे तर कुत्र्याने केल्याचे स्पष्ट झाले. शिकारी प्रतिबंधक पथकाने पुन्हा बिबट्यांची शोधमोहीम सुरु केली होती.
बिबट्यासाठी परिसरात सहा ट्रॅप कॅमेरे
बिबट आढळलेल्या ६ ठिकाणी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तीन पथके तयार करण्यात आली असून फायरिंंग ग्रांऊड, ९,११ क्रमांकाच्या इमारतीजवळ गस्त घालतील.