पादचारी वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकले, चेनस्नॅचर्स पुन्हा सक्रिय
By admin | Published: March 22, 2017 12:11 AM2017-03-22T00:11:25+5:302017-03-22T00:11:25+5:30
स्थानिक शारदनगरात वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. दोन दिवसांतील ही दुसरी घटना असून
अमरावती : स्थानिक शारदनगरात वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. दोन दिवसांतील ही दुसरी घटना असून शहरात पुन्हा ‘चेनस्नॅचर्स’ सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी वृद्धेला मंगळसूत्र हिसकावताना जोरदार धक्का दिल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
शारदानगरातील रहिवासी मालती मधुकर पुऱ्हेकर (७६) या सकाळी नारायणगुरू महाराजांच्या भक्तांद्वारे गणेश कॉलनीत आयोजित यज्ञाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी पुऱ्हेकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मालतीबार्इंनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांनी याघटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मालती पुऱ्हेकर यांना तत्काळ इर्विनमध्ये वैद्यकीय तपासणीकरिता नेले. राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस शारदानगरातील व्यापारी प्रतिष्ठाने, घराच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. (प्रतिनिधी)
२४ तासांतील दुसरी घटना
शहरात काही महिन्यांपूर्वी चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आता पुन्हा सोनसाखळीचोर सक्रिय झाल्याचे २४ तासांत घडलेल्या घटनांवरून लक्षात येते. सोमवारी सायंकाळी राजकमल चौकानजीक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले होते. काही नागरिकांनी आरोपी दिलीप मधुकर एकुनकर (३०,रा. वरद, राळेगाव, जि.यवतमाळ) याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. दुसरी घटना मंगळवारी शारदानगरात घडली आहे.