पती अन् नोकराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:56 PM2018-11-28T22:56:37+5:302018-11-28T22:58:02+5:30

शहरातील बहुचर्चित ताहेरा बानो हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मृत महिलेचा पती हाजी अदील अयूब साबीर (६५, रा. असिर कॉलनी) व नोकर नौशाद बेग हुसैन बेग (३२, रा. गुलिस्तानगर) या दोघांना अटक केली.

Husband and servant arrested | पती अन् नोकराला अटक

पती अन् नोकराला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देताहेरा बानो हत्याकांडतपास गुन्हे शाखेकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील बहुचर्चित ताहेरा बानो हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मृत महिलेचा पती हाजी अदील अयूब साबीर (६५, रा. असिर कॉलनी) व नोकर नौशाद बेग हुसैन बेग (३२, रा. गुलिस्तानगर) या दोघांना अटक केली. तथापि पतीनेच खून केल्याचे ठोस विधान पोलिसांकडून करण्यात आले नाही. परिस्थितिजन्य व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
हजरत बिलालनगरात १८ नोव्हेंबर रोजी भरदुपारी १.३० वाजता ताहेरा बानो (६०) यांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आला. ताहेरा बानो यांची गळा आवळून व तोंड दाबून हत्या झाल्याचे शवविच्छेद अहवालात उघड झाले. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३९४, ३०२, ३४ अन्वये (जबरी चोरी व हत्या) गुन्हे नोंदविले. या हत्याकांडात परिचितांवर पोलिसांना संशय होता. त्या दृष्टीने पोलिसांनी ताहेरा बानो यांच्या परिचितांची चौकशी केलीही. ताहेरा बानो यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला नाही. पोलीस तपासात अत्यंत गोपनियता पाळण्यात आली. तब्बल दहा दिवस ही चौकशी चालल्यानंतर अखेर बुधवारी पोलिसांनी पती अदील व त्याच्या रेशन दुकानातील नोकर नौशाद यांना अटक केली.
एक मतप्रवाह असाही!
अदील व ताहेरा बानो यांच्या दोन विवाहित मुलींपैकी एक मुंबईला तर दुसरी अमरावतीत राहते. अमरावतीतील मुलीच्या प्रेमविवाहाला अदील व ताहेरा बानोंचा विरोध होता. अलिकडे ताहेरा बानोने मुलीला जवळ केले. संपत्तीचा वाटा दोघींनाही समसमान देण्याची इच्छा ताहेरा बानोंची होती. त्याला अदीलचा विरोध होता, असा एक प्रवाह या प्रकरणात पुढे येत आहे. प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या बाजूने नेहमीच ताहेरा बानो बोलत होती. नेमकी हीच बाब अदीलला खटकली असावी. त्यामुळे अदीलने कट आखून ताहेरा बानोची हत्या केल्येचा तर्कही तपास पोलिसांनी लावल्याची माहिती आहे. तथापि याबाबत कुठलेही अधिकत विधान करण्यात आलेले नाही. अदील व नौशादच्या बयाणात तफावत होती. घटनेपूर्वी रेशन दुकानात असल्याचे बयाण अदीलचे आहे. मात्र, हत्या होण्यापूर्वी तो घरी गेला होता, ही माहितीसुद्धा पुढे आली आहे. त्यामुळे हत्येचा संशय अदीलवर बळावला आहे. पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील, असा विश्वास पोलिसांना आहे.
बहुचर्चित प्रकरणाबाबत गोपनीयता का?
पोलिसांनी ताहेरा बानो हत्याकांडात पती आणि नोकराला अटक केली. या बहुचर्चित प्रकरणात मिळालेल्या या यशाची खरे तर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी पत्रपरिषद घेऊन माहिती द्यायला हवी होती; तथापि त्यांनी तसे केले नाही. एरवी लहानसहान मुद्यांवर प्रसिद्धीपत्रके जारी करणारे अमरावती शहर पोलीस या मुद्यावर मात्र पत्रकारांनी विचारल्यावरही माहिती द्यायला तयार नाहीत. पोलीस आयुक्तांनी तर जणू पत्रकारांशी बोलायचेच नाही असे ठरविले असावे, अशीच त्यांची कार्यपद्धती जाणवत आहे. त्यांचे अधिकारीही या प्रकरणाबाबत कमालिची गोपनीयता बाळगून आहेत. आयुक्तांची ही गोपनीयता अनेक प्रश्नांना जन्म देऊ लागली आहे.
दहा दिवसांत तीन तपास अधिकारी
ताहेरा बानो हत्याकांडात पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात प्रथम तपास अधिकारी म्हणून राजेंद्र देशमुख हे होते. त्यांनी नऊ दिवस या प्रकरणाचा तपास केला. बुधवारी सकाळी तो तपास गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डीजींनी मागविला अहवाल
ताहेरा बानो हत्याकांडाचा मुद्दा व शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या विषयावर आमदार सुनील देशमुख यांची लक्षवेधीसाठी सूचना स्वीकारली गेली आहे. त्या अनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयातून अमरावती पोलिसांना माहिती मागविण्यात आली. बुधवारी आरोपींना अटक केल्यानंतर त्यासंबंधिचा अहवाल डीजी कार्यालयाला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.


ताहेरा बानो हत्याकांडात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास अधिकारी आरोपींची चौकशी करीत आहेत.
- यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त

Web Title: Husband and servant arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.