पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:58 AM2020-09-12T10:58:23+5:302020-09-12T10:58:42+5:30
पत्नीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली होती. या प्रकरणी १८ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरुन आई व तिच्या प्रियकराविरुद्ध शुक्रवारी बडनेरा पोलिसांनी कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्नीच्या विवाहबाह्य संबधाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली होती. या प्रकरणी १८ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरुन आई व तिच्या प्रियकराविरुद्ध शुक्रवारी बडनेरा पोलिसांनी कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पत्नी प्रियकारासोबत पुणे येथे निघुन गेल्याचा परिणाम पतीच्या मनावर झाला होता.
निलेश चौधरी रा. भुसावळ व एक महिला असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सुत्रानूसार निलेश व मृताच्या पत्नीचे सतत फोनवर बोलणे असायचे. त्यावरुन पत्नी-पतीमध्ये खटके उडायचे. १४ मे २०२० रोजी ही महिला प्रियकरासोबत निघून गेली. मी निलेशसोबत पुणे येथे आहे. आता कधीही परत येणार नाही, असे तिने मुलीला फोन करून सांगितले. त्यानंतर वडिलांनी पत्नीशी बोलून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने नकार दिल्याने त्यांना धक्का बसला. आपण आत्महत्या करतो, असे त्यांनी मुलीजवळ अनेकदा बोलून दाखविले. मुलीने वडिलांना असे करु नका, आपण आजीकडे राहू, मी नोकरी करेल. सर्व बरोबर होईल असे समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर त्यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी मुलीला मोबाईलवरुन यासंदर्भात मॅसेज सुद्धा पाठविले होता. तपास पीएसआय प्रशांत डगवार करीत आहेत.