हुंडाबळी; पती, सासऱ्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:16 PM2021-11-29T17:16:33+5:302021-11-29T17:29:19+5:30
१ ऑगस्ट २०१३ रोजी राहत्या घरी पूजाने जाळून घेतले होते. तिच्या मृत्यूला हे चौघे जबाबदार असल्याची फिर्याद परतवाडा पोलीस ठाण्यात मृत पूजाची आई रेखा युवराज खाडे यांनी दाखल केली होती.
अमरावती : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. तिचा जळून मृत्यू झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी पती व सासऱ्याला दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ एस.एन. यादव यांच्या न्यायालयाने सोमवारी सुनावली.
विधी सूत्रांनुसार, प्रवीण बबनराव यावले (३५), बबनराव गोविंदराव यावले (६६, रा. व्यंकटेशनगर, देवमाळी, ता. अचलपूर) अशी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. सबळ पुराव्याभावी सासू व दिराची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
प्रवीणचे लग्न २०११ मध्ये पूजाशी झाले होते. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून पती, सासू, दीर सासरा सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने १ ऑगस्ट २०१३ रोजी राहत्या घरी पूजाने जाळून घेतले होते. तिच्या मृत्यूला हे चौघे जबाबदार असल्याची फिर्याद परतवाडा पोलीस ठाण्यात मृत पूजाची आई रेखा युवराज खाडे (रा. चौसाळा, ता. अचलपूर) यांनी दाखल केली होती.
पोलिसांनी भादंविचे ४९८ अ, ३०४ ब अन्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक निरीक्षक समीर अहिरराव यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. प्रकरणात सरकारी अभियोक्ता धनराज नवले यांनी प्रखर युक्तिवाद करीत ११ साक्षीदार तपासले. त्यात आजोबा व मामा यांची साक्ष व आरोपींच्या अंगावरील जखमा पुरावा दाखल महत्त्वाचे ठरले.
मृताला एक वर्षाची मुलगी होती. पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक दादाराव डहाके यांनी काम पाहिले. ३९८ अ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, तर ३०४ ब मध्ये दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली. पुराव्याअभावी सासू शुद्धमती यावले व दीर प्रफुल यावले यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.