पतीने कर्तव्य निभावलं, किडनी देत पत्नीला नवं आयुष्य दिलं!
By उज्वल भालेकर | Published: June 15, 2024 06:51 PM2024-06-15T18:51:55+5:302024-06-15T18:52:39+5:30
सुपर स्पेशालिटीमध्ये ४० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
उज्वल भालेकर, अमरावती : आयुष्यभराचा साथ देण्याची शपथ दिलेल्या आपल्या साथीदार पत्नीच्या गंभीर आजारपणात पती देवदूत ठरला आहे. दोन्ही किडनी निकामी झालेल्या ४७ वर्षीय पत्नी सरला तुंडलवार यांना ५७ वर्षीय पती उदय तुंडलवार यांनी आपली किडनी दान देऊन नवे जीवनदान दिले आहे. स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे ४० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर पती, पत्नी दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे अमरावती विभागातून किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील रहिवासी असलेल्या सरला उदय तुंडलवार या मागील दोन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. यावेळी आपल्या पत्नीला होणारा त्रास लक्षात घेता पती उदय तुंडलवार यांनी आपल्या पत्नीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. तसेच, आपल्या पत्नीला देखील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्यांनी प्रोत्साहीत करत तयार केले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया निशुल्क केली.
सुपरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरिकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अब्बास अली, डॉ. माधव ढोपरे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यावेळी परिचारिका अनिता तायडे, सरला राऊत, नीता कांडलकर, कविता बेरड, नीलिमा तायडे, लता मोहता, अभिषेक नीचत, स्नेहल काळे, नम्रता दामले, अनिता खोब्रागडे, योगिश्री पडोळे, रेखा विश्वकर्मा सोबतच अभिजित देवधर, वैभव भुरे, अनु वडे, नितीन मते यांनी यासाठी सहकार्य केले.