निर्दयी पतीचे कृत्य, किरकोळ वादातून गळ्यावर मारल्या लाथा, पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 05:40 PM2022-06-04T17:40:17+5:302022-06-04T18:39:01+5:30

पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Husband kills wife over domestic dispute in amravati | निर्दयी पतीचे कृत्य, किरकोळ वादातून गळ्यावर मारल्या लाथा, पत्नीचा मृत्यू

निर्दयी पतीचे कृत्य, किरकोळ वादातून गळ्यावर मारल्या लाथा, पत्नीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देटोंगलापूर येथील घटना, आरोपीला अटक

चांदूर बाजार (अमरावती) : तालुक्यातील टोंगलापूर येथे पती-पत्नीत झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात पतीने पायाने पत्नीचा गळा दाबला. यामुळे तिचा मृत्यू झाला. ३ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी टोंगलापूर येथील पोलीस पाटील शुभांगी गजानन मानकर (४०) यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानुसार, मृत अंजुषा उईके व आरोपी पुन्नू उईके हे पती- पत्नी १५ दिवसांआधी आठ महिन्यांच्या बाळासह टोंगलापूर येथे कायमस्वरूपी राहायला आले होते. त्या दोघा पती-पत्नीचे घरगुती कारणावरून सतत भांडण होत होते. ३ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास अंजुषा व पुन्नू यांच्यात जोरदार भांडण झाले. यात पुन्नूने पत्नी अंजुषा हिला जबर मारहाण केली व गळ्यावर लाथ मारल्याने ती बेशुद्ध पडल्याची माहिती गावातील संजय रंगलाल धुर्वे याने पोलीस पाटलांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली तेव्हा ती घरात कोसळली होती. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अंजुषाला चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घरगुती कारणावरून होणाऱ्या वादातून पुन्नूने पायाने गळा दाबून तिला ठार केल्याच्या पोलीस पाटलांच्या तोंडी तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार सुनील किनगे यांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपी पुन्नूला टोंगलापूर शिवारातून अटक केली.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक राऊत, पोलीस उपनिरीक्षक मेश्राम, सहायक उपनिरीक्षक विनोद इंगळे, जमादार अजय पाथरे, नाईक निकेश नशिबकर व भूषण पेठे, पंकज येवले, विक्की दुर्णे, अमोल टेकाडे हे करीत आहेत.

Web Title: Husband kills wife over domestic dispute in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.