पत्नीने घेतला गळफास पतीची विहिरीत उडी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:34 PM2018-09-21T23:34:29+5:302018-09-21T23:34:57+5:30
दाम्पत्यात उद्भवलेल्या वादात पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे शुक्रवारी घडली. पत्नीने स्वत:ला गळफास लावल्यानंतर पतीने विहिरीत उडी घेतल्याची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना प्राप्त झाली; मात्र तो सापडत नसल्याने त्याचा शोध मंगरूळ पोलीस करीत आहेत. या आत्महत्येने व अचानक पती बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : दाम्पत्यात उद्भवलेल्या वादात पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे शुक्रवारी घडली. पत्नीने स्वत:ला गळफास लावल्यानंतर पतीने विहिरीत उडी घेतल्याची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना प्राप्त झाली; मात्र तो सापडत नसल्याने त्याचा शोध मंगरूळ पोलीस करीत आहेत. या आत्महत्येने व अचानक पती बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील निंभोरा बोडखा येथील सुनीता संजय दाभाडे (३५) हिने २० वर्षांपूर्वी गावातीलच संजय दाभाडे (४२) याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. शेती व मोलमजुरी करून आठवी व अकरावीत शिकत असलेल्या प्रतीक व कार्तिक या दोन मुलांसह हे दोघे गावातच राहात होते. काही काळापासून त्यांच्यात वाद झडत होता. सुनीताचे माहेर गावातील असल्याने गुरुवारी ती तेथे गेली. यानंतर तिला मारहाण करीत संजयने घरी आणले. या वादातूनच ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज ठाणेदार विवेकानंद राऊत यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास सुनीताने स्वत:ला गळफास लावून घेतल्याची बातमी गावात पसरली. घटनेची माहिती मिळताच सुनीताचा भाऊ अंकुश भीमराव डोंगरे (२६) हा घटनास्थळी पोहचला. सुनीताने घराच्या आतील लाकडी मायलीला सुती दोराने गळफास घेतला, तर जावई संजय हा दुसऱ्या खोलीत रडत बसल्याचे त्याने पाहिले. वादविवादातून ही घटना घडल्याच्या संशयावरून अंकुशने मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला. दरम्यान, संजयने पोलीस पाटील विशाल बांते यांना माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी त्याला जवळच्या विहिरीकडे धाव घेताना पाहिले. काही अंतरावर त्याच्या चपला होत्या. संजयने त्यात उडी घेतल्याच्या संशयावरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी पाणी उपसून त्याचा शोध घेणे सुरू केले. मात्र, अद्यापही संजय वा त्याचा मृतदेह त्यांना गवसला नाही. सुनीताने केलेली आत्महत्या की हत्या, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुढील तपासात मंगरूळ पोलीस करीत आहेत.