ना खायला देत होती, ना चांगली वागायची! पत्नीच्या त्रासापायी पतीने केली आत्महत्या

By प्रदीप भाकरे | Published: December 22, 2023 05:29 PM2023-12-22T17:29:55+5:302023-12-22T17:31:11+5:30

पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल.

husband neither feeding nor behaving well the husband ends her life due to the trouble of his wife in amravti | ना खायला देत होती, ना चांगली वागायची! पत्नीच्या त्रासापायी पतीने केली आत्महत्या

ना खायला देत होती, ना चांगली वागायची! पत्नीच्या त्रासापायी पतीने केली आत्महत्या

प्रदिप भाकरे पाटील, परतवाडा : पतीच्या त्रासापायी पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडत असतात. पतीच्या शारीरिक, मानसिक जाच असहय होऊन अनेक विवाहिता आत्मघात करवून घेतात. मात्र, पत्नीच्या त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याची घटना अपवादात्मकच. चक्क पत्नीच्या त्रासापायी पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. यात पतीला छळणाऱ्या पत्नीविरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशोक वसंतराव इंगोले (३५, रा. हिवरा बुद्रूक, ता. नांदगाव खंडेश्वर, हल्ली मुक्काम गौरखेडा कुंभी, ता. अचलपूर) असे मृताचे नाव आहे.
                         
पोलीस तक्रारीनुसार, अशोक वसंतराव इंगोले याने १ डिसेंबर रोजी गौरखेडा कुंभी येथे आत्महत्या केली. यावरून परतवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून केली. मात्र, चौकशीदरम्यान अशोक इंगोले याला त्याच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पत्नी सीमा अशोक इंगोले (२९, रा. गौरखेडा कुंभी) हिच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३०६ अन्वये २१ डिसेंबर रोजी गुन्हा नोंदविला. अशोक आणि सीमा यांचा सन २०१२ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर नऊ वर्षे अशोकच्या मूळ गावी हिवरा बुद्रूक येथे दाम्पत्य वास्तव्यास होते. यादरम्यान सीमाने गावातील बचत गटाकडून १ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज काढले. पण, तिचे घरात कुणाशीही पटत नव्हते. सासरच्या मंडळीसमवेत ती सतत भांडत राहायची. तिच्या वागणुकीमुळे अशोक त्रस्त होता. यातच दीड वर्षापूर्वी अशोकसोबत भांडण करून सीमा माहेरी गौरखेडा कुंभी येथे मुलीसह निघून आली.

काही दिवसांनंतर अशोकही गौरखेडा कुंभी येथे येऊन सीमासोबत राहू लागला. गौरखेडा कुंभी येथील शेरे पंजाब धाब्यावर तो मजुरी करू लागला. सीमाने काढलेल्या बचत गटाच्या कर्जाचे हप्ते तो भरत होता. मात्र, त्यानंतरही सीमा अशोकसोबत भांडायची. त्यांच्यातील नाते जवळपास संपुष्टात आले होते. ती त्याचा छळ करायची.

केवळ पैसा अन् पैसाच!

ती अशोकला जेवायलाही देत नव्हती. सतत पैसे मागायची. हा सर्व घटनाक्रम अशोकने मृत्यूपूर्वी ३० नोव्हेंबर रोजी आपल्या आईला आणि १ डिसेंबरला दुपारी वडिलांना फोनवरून सांगितला. वडिलांसोबत फोनवर बोलणे सुरू असतानाच मध्येच फोन कट झाला आणि काही तासांनंतरच अशोकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप त्याच्या आई-वडिलांना मिळाला.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून अशोकने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे साक्षीदारांनी सांगितले. साक्षीदारांचा जबाब आणि मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.-संदीप चव्हान, ठाणेदार, परतवाडा

Web Title: husband neither feeding nor behaving well the husband ends her life due to the trouble of his wife in amravti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.