पत्नीचा खून करुन पळून जाणाऱ्या पतीस अखेर अटक; एलसीबीची यशस्वी कार्यवाही
By प्रदीप भाकरे | Published: September 17, 2023 02:55 PM2023-09-17T14:55:07+5:302023-09-17T14:55:27+5:30
भर रस्त्यात पत्नीचा खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला अखेर अटक करण्यात आली.
अमरावती : भर रस्त्यात पत्नीचा खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला अखेर अटक करण्यात आली. कचरु सुखराम कास्दे (४८, रा.कावला ता. भैसदेही, मध्यप्रदेश) असे अटक मारेकऱ्याचे नाव असून त्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमरावतीलगतच्या बडनेरा शहरातून अटक केली. रविवारी ही कार्यवाही करण्यात आली. याप्रकरणी ४ सप्टेंबर रोजी ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. नितु कचरु कास्दे (४२, रा. कावला ता. भैसदेही) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावला येथील कचरु सुखराम कास्दे हा पत्नी नितु कचरु कास्दे हिच्यासमवेत ४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातून मजुरी काम करुन घाटलाडकीमार्गे कावला या मुळगावी जात होता. दरम्यान घाटलाडकीसमोरील रस्त्यावर दोघा पतीपत्नीमध्ये वाद होऊन पती कचरु याने पत्नी नितु हिचा खून केला. तथा तो पळून गेला. तो घटनेच्या दिवशीपासून फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या पाठीमागे होते.
बायकोचा अंतिमसंस्कार टाळला
आरोपी हा पत्नीच्या अंतिमसंस्काराला हजर राहिला नाही. तो गावाकडे फिरकला देखील नाही. दरम्यान तो बडनेरा येथे लपून बसल्याची खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बडनेरा येथे पोहचले. सापळा लावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पुढील कार्यवाही करीता ब्राम्हणवाडा (थडी) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कार्यवाही
पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, सचिन मिश्रा चालक संजय गेठे यांनी ही कारवाई केली.