मेहुणीच्या साक्षगंधाहून परतताना झाला घात; पती-पत्नी ठार, चिमुकला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 12:27 PM2022-12-09T12:27:25+5:302022-12-09T12:37:55+5:30
मोर्शी-रिद्धपूर-शिरखेड मार्गावरील घटना
परतवाडा : अवघ्या अडीच वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेले दाम्पत्य बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मोर्शी-रिद्धपूर-शिरखेड मार्गावर झालेल्या अपघातात घटनास्थळीच ठार झाले. यादरम्यान त्यांच्यासमवेत दुचाकीवर असलेला त्यांचा एक वर्षीय एकुलता एक चिमुकला बचावला. त्याच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
परतवाडा शहरालगत देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बालाजीनगरमधील छोटू उर्फ पीयूष दिगंबर वाठोडकर (३०) आणि प्रतीक्षा वाठोडकर (२५) हे पती-पत्नी एक वर्षीय श्रीयंश नामक चिमुकल्यासमवेत निंभी या गावी मित्राच्या दुचाकीने गेले होते. तेथे प्रतीक्षाच्या माहेरकडील कार्यक्रमात या दोघांनीही आपली हजेरी लावली. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेतल्या. सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांच्या दुचाकीला मध्येच अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात ते दोघेही घटनास्थळीच ठार झाले.
पीयूष आणि प्रतीक्षा यांचे पार्थिव घटनास्थळावरून अमरावतीला दवाखान्यात दाखल केले गेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर हे दोन्ही मृतदेह देवमाळी येथील त्यांच्या राहत्या घरी एकाच वाहनातून आणले गेले. अंत्यविधीकरिता या दोघांचेही पार्थिव एकाच स्वर्गरथात ठेवून हिंदू स्मशानभूमीत दाखल केले गेले. तेथे या दोघांच्याही पार्थिवावर एकाच वेळी अंतिम संस्कार केले गेले. यात त्यांचा अखेरचा प्रवासही एकत्रितच झाला.
आईवडिलांसमवेत अखेरचा वाढदिवस
अवघ्या काही दिवसांपूर्वीच आपल्या एकुलत्या एक मुलाचा पहिला वाढदिवस पीयूष आणि प्रतीक्षा यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. हा वाढदिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.