हवाला रकमेचे ‘हैदराबाद’ कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:00 AM2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:01:07+5:30
सूत्रांनुसार, १५ सप्टेंबर २०२० मध्ये हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स भागात दोन वाहनांमधून ३.७५ कोटी रुपये जप्त केले होते. त्यावेळी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. रकमेची वाहतूक आपण कमलेश शहा यांच्या सूचनेनुसार करीत होतो, अशी कबुली त्या चौघांनी दिली होती. अटकेतील आरोपी हे अहमदाबाद येथील कमलेश शहा यांच्या बंजारा हिल्स शाखेचे कर्मचारी असल्याचे तेथील हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांनी स्पष्ट केले होते.
प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान जप्त केलेल्या ३.५० कोटींच्या व्यवहाराचे ‘स्ट्रॉंग गुजरात कनेक्शन’ उघड झाले होते. आता ‘हैदराबाद कनेक्शन’ पोलीस दप्तरी नोंदविले गेले. गुरुवारी हैदराबाद पोलिसांकडून राजापेठ पोलिसांना विस्तृत ‘टेलिफोनिक’ विचारणा करण्यात आली. अमरावतीत पकडले गेलेले हवाला रकमेशी संबंधित अहमदाबादेतील इसम हे हैदराबाद येथे पकडण्यात आलेल्या हवाला कांडाशी संलग्न असल्याची माहिती पलीकडून देण्यात आली. त्यामुळे की काय, पोलिसांनीही आयकर विभागासह ‘पॅरेलल’ तपासाची परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात सादर केला आहे.
सूत्रांनुसार, १५ सप्टेंबर २०२० मध्ये हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स भागात दोन वाहनांमधून ३.७५ कोटी रुपये जप्त केले होते. त्यावेळी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. रकमेची वाहतूक आपण कमलेश शहा यांच्या सूचनेनुसार करीत होतो, अशी कबुली त्या चौघांनी दिली होती. अटकेतील आरोपी हे अहमदाबाद येथील कमलेश शहा यांच्या बंजारा हिल्स शाखेचे कर्मचारी असल्याचे तेथील हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी आरोपींचा बाॅस म्हणून कमलेश शहा यांचे नाव उघड झाले होते. अमरावतीत पकडलेल्या रकमेवर अहमदाबाद येथील कमलेश शहा यांनीच दावा केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. जे पत्र देण्यात आले, त्यात ती रक्कम नीना कमलेश शहा यांच्या प्रोप्रायटर फर्मची असल्याचे म्हटले आहे. कमलेश शहा हे नाव दोन्ही प्रकरणात ‘कॉमन’ आहे. म्हणून अमरावती पोलीस हैदराबाद पोलिसांकडून दहा महिन्यांपूर्वीची माहिती मागविणार आहेत.
दहशतवादी कारवायात हवालाचा पैसा?
मुंबईत जुलै २००७ मध्ये झालेला बॉम्बस्फोट, गुजरातमधील २००८ मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी दहशतवाद्यांना हवालामार्फत पैसा पुरवण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आले होते. दहशतवादविरोधी पथकाकडून सन २०१४ मध्ये दहशतवादी कारवायांसंदर्भात सुरू असलेल्या तपासात, मुंबईतील २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी हवालामार्फत दहशतवाद्यांना पैसा आल्याची माहिती मिळाली होती. गुटखा व्यावसायिकांच्या माध्यमातून हा हवाला चालत असल्याचेही आढळून आले होते.
काय आहे हवाला?
हवाला म्हणजे सोप्या शब्दात गॅरंटी! आर्थिक व्यवहारात ‘हवाला’ म्हणजे पैसे देण्याघेण्याची व्यवस्था. हे प्रकरण केवळ विश्वासाच्या अलिखित करारावर चालते. फार पूर्वी जेव्हा बँका अस्तित्वात नव्हत्या, आधुनिक करप्रणाली अस्तित्वात नव्हती तेव्हा हवाला राजमान्य होता. त्यानंतर पेढ्यांमध्ये हुंडीवर पैसे मिळण्याची सोय झाली. त्यानंतर हवाला आपोआप बेकायदेशीर झाला.