गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं - ॲड. प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:10 PM2023-01-23T12:10:46+5:302023-01-23T12:18:42+5:30
अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली
अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात बोलणी सुरू आहे. ठाकरे यांचे फायनल झाले की घोषणा होईल. ठाकरे यांना वाटते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊ. त्यांची बोलणी झाली की मग निर्णय घेऊ. मात्र, मी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत बोलत नाही, त्यांना गरज असेल तर आमच्याशी बोलावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अमरावती येथे मांडली.
ॲड. प्रकाश आंबेडकर हे अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकार यांच्या प्रचारार्थ बैठकीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीला तिसरे इंजिन लावू. मग ते राष्ट्रवादीचे असेल की मनसेचे लावणार, हे येणारा काळच सांगेल. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेले होते. आम्ही त्यांना नाकारलेले नाही, आम्ही केवळ दलितांपूर्वी पुरते मर्यादित राहावे, अशी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका आहे. ती आम्हाला मान्य नाही, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गरज असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास आमचा विरोध नाही, असेही ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, महिला प्रदेशाध्यक्ष निशा शेंडे, धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष शैलेश गवई आदी उपस्थित हाेते.